भानखेड येथे धुळवडीची आगळीवेगळी परंपरा

04 Mar 2026 16:08:30
पवनकुमार लढ्ढा 
चिखली
dhulwadi in bhankhed महाराष्ट्र हा विविध संस्कृती, परंपरा आणि लोकजीवनाने समृद्ध असा प्रदेश म्हणून ओळखला जातो. गावागावांत आजही अनेक रूढी-परंपरा जपल्या जात असून त्या स्थानिक संस्कृतीची ओळख टिकवून ठेवतात. चिखली तालुक्यातील भानखेड येथे आदिवासी कोळी समाजाकडून धुळवडीच्या दिवशी पाळली जाणारी अशीच एक आगळीवेगळी परंपरा आजही मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. येथे महिलांकडून पुरुषांना रुईच्या झाडाच्या फोक्यांनी मार देण्याची अनोखी प्रथा पिढ्यान्‌पिढ्या सुरू आहे.
 

होळी भानखेड  
 
 
भानखेड येथे होळीचा उत्सव पारंपरिक पद्धतीने साजरा केला जातो. होळीच्या दिवशी गावकरी एकत्र येऊन गौवऱ्या जमा करतात आणि सामूहिक होळी पेटवली जाते. दुसऱ्या दिवशी धुळवडीच्या दिवशी गावातील सरपंच, पोलीस पाटील व ज्येष्ठ नागरिक होळीची राख घेऊन गावातील हनुमान मंदिराकडे प्रस्थान करतात. त्याआधी गावाच्या वेशीपासून सरपंच, पोलीस पाटील आणि गावकरी घरोघर जाऊन फगवा मागतात. प्रत्येक कुटुंबाकडून प्रतीकात्मक स्वरूपात दहा रुपये तसेच गहू व ज्वारी असे धान्य दिले जाते.
यानंतर हनुमान मंदिरासमोर सुमारे ८० किलो वजनाचा दगडाचा गोळा ठेवण्यात येतो. स्थानिक भाषेत या दगडाला “गुंड” असे म्हणतात. या गुंडची विधीपूर्वक पूजा केल्यानंतर गावातील तरुण मंडळी तो उचलून मंदिराला प्रदक्षिणा घालतात. त्यानंतर सरपंच, पोलीस पाटील व ज्येष्ठ मंडळी एकेक बोट लावून हा गुंड उचलून मानमोळा करतात.
दरम्यान गावातील वाजंत्री जंगलातून रुईच्या झाडाच्या फोक्या आणतात आणि त्या महिलांना दिल्या जातात. महिला रस्त्याच्या दोन्ही बाजूंना उभ्या राहतात आणि त्यांच्या मधून पुरुष मंडळी जातात. त्या वेळी महिला पुरुषांना रुईच्या फोक्यांनी हलक्या फटक्यांनी मार देतात. या फटक्यांमुळे इडा-पिडा दूर राहते, आरोग्य चांगले राहते आणि वर्षभर अनिष्ट टळते, अशी गावकऱ्यांची श्रद्धा आहे.
फगवा मागून जमा झालेली रक्कम व धान्य त्या वर्षी मान असलेल्या खुटातील महिलांकडे सुपूर्द केले जाते. या रकमेतून महिला गावातील मरीमाता देवीला पातळ चढवतात तसेच जमा झालेल्या धान्यातून प्रसाद तयार करून गावकऱ्यांना वाटप केला जातो.
अनेक ठिकाणी आदिवासी परंपरा लोप पावत असताना भानखेड गावातील नागरिकांनी मात्र ही परंपरा आजही जतन केली आहे. dhulwadi in bhankhed गावकऱ्यांच्या सामूहिक सहभागामुळे होळी आणि धुळवडीचा हा अनोखा उत्सव दरवर्षी उत्साहात साजरा होत असून, भानखेडची ही परंपरा सांस्कृतिक वारशाचे जतन करणारे प्रेरणादायी उदाहरण ठरत आहे.
बॉक्स : भानखेडच्या धुळवडीची वैशिष्ट्ये
* धुळवडीच्या दिवशी महिलांकडून पुरुषांना रुईच्या फोक्यांचा मार
* गावात घरोघर जाऊन फगवा मागण्याची परंपरा
* हनुमान मंदिरासमोर ८० किलोचा “गुंड” दगड उचलण्याची प्रथा
* फगव्यातून मिळालेल्या रक्कम व धान्यातून मरीमातेला पातळ व प्रसाद वाटप
* आदिवासी कोळी समाजाची पिढ्यान्‌पिढ्या जपलेली सांस्कृतिक परंपरा
Powered By Sangraha 9.0