वर्धा,
thieves-arrested : घरफोडी करणार्या अट्टल चोरट्यांना स्थानिक गुन्हे शाखेच्या चमूने यवतमाळ येथून अटक केली. त्याच्याकडून १० लाख ४१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. विवेक उर्फ मांडा मंगरे (१९), आकाश उर्फ रॅपर वाढवे, प्रसाद उर्फ दादू देवकते (२०) व आकाश उर्फ भुई शेंडे (१९) सर्व रा. तलाव फैल यवतमाळ अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

समतानगर येथील प्रवीण लोहवेरा यांच्या घरी चोरी करून अज्ञात चोरट्यांनी सोने, चांदीचे दागिने व रोख असा ऐवज लांबविला होता. तक्रारीवरुन पोलिसांनी गुन्हा नोंद केला. या गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखेचे पथक करीत होते. तपासादरम्यान चंद्रपूर, नागपूर व यवतमाळ या जिल्ह्यातील घरफोडी करणारे सराईत गुन्हेगारांना तपासण्यात आले. पोलिसांनी तांत्रिक पुरावे गोळा करून सूत्रांकडून मिळालेल्या माहितीवरून यवतमाळ जिल्ह्यातील घरफोडी करणारे सराईत गुन्हेगार विवेक उर्फ मांडा मंगरे, आकाश उर्फ रॅपर वाढवे यांनी सदरची घरफोडी केल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी यवतमाळ येथे जावून त्यांना शिताफीने ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली. त्यांचे सहकारी प्रसाद उर्फ दादू देवकते व आकाश उर्फ भुई शेंडे यांच्या मदतीने चोरीतील ऐवज विकल्याचे सांगितले. त्यांना सुद्धा ताब्यात घेण्यात आले. चौघांकडूनही ६१ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, ३५ ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने व रोख १ लाख ४१ हजार रुपये, दुचाकी असा १० लाख ४१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
ही कारवाई पोलिस अधीक्षक सौरभ अग्रवाल, अपर पोलिस अधीक्षक सदाशिव वाघमारे यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक विनोद चौधरी, पोलिस उपनिरीक्षक विजयसिंग गोमलाडू, पोलिस उपनिरीक्षक प्रकाश लसुंते, पोलिस अंमलदार शेखर डोंगरे. अरविंद येनुरकर, रोशन निंभोरकर, रवी पुरोहित, विकास मुंढे, सुगम चौधरी, शुभम राऊत, अभिषेक नाईक, राहुल लुटे, रितेश गेटमे, दिनेश बोथकर, अक्षय राऊत, गोविंद मुंडे यांनी केली.