उसनवारीच्या वादातून युवकाची हत्या

04 Mar 2026 21:50:27
अमरावती, 
youth-killed-over-dispute : मालखेड मार्गावरील जंगलातील विहिरीत एका युवकाचा मृतदेह आढळून आल्याची घटना रविवार, १ मार्च रोजी दुपारी उघडकीस आली होती. शवविच्छदेन अहवालावरून सदर युवकाची हत्या करण्यात आल्याचे समोर आले होते. या हत्याकांडाचा उलगडा करण्यात गुन्हे शाखेला यश आले. उसनवारीच्या वादातून तरुणाची हत्या करून त्याचा मृतदेह विहिरीत फेकण्यात आल्याचे तपासात समोर आले. या प्रकरणात एकूण आठ आरोपी निष्पन्न झाले. त्यातील चार आरोपींना अटक करण्यात आली. तीन आरोपी खुनाच्या अन्य एका गुन्ह्यात कारागृहात आहेत. एक आरोपी अद्याप फरार आहे.
 
 
ghkl
 
अमर मोतीलाल व्यास (३७, रा. महादेवखोरी), असे मृताचे नाव आहे. जय नागोराव कोकाटे (१९, रा. वरूणनगर, महादेवखोरी), गौरव दिलीप गजभिये (२५, रा. संजय गांधीनगर), निश्चय सुनील पोटफोडे (२१, रा. जीवन छाया कॉलनी) व संजय विलास वानखडे (२३, रा. महादेवखोरी), अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. आदेश रघुनाथ तेलमोरे (२४), रोहीत संजय तायडे (२३) व दीप उर्फ यशोदीप विनायक वेलकर (२५) तिघेही रा. महादेवखोरी हे तीन आरोपी नांदगाव पेठ ठाण्यात दाखल खुनाच्या एका गुन्ह्यात सध्या कारागृहात आहेत. तुषार अनिल सुपनेर (२५, रा. संजय गांधीनगर) हा फरार आहे. रविवारी दुपारी मालखेड मार्गावरील जंगलात वन विभागाच्या कर्मचार्‍यांना विहिरीत एका तरुणाचा मृतदेह आढळून आला होता. पोलिसांच्या तपासात मृतक हा अमर व्यास असल्याचे समोर आले. दरम्यान, शवविव्छेदन अहवालावरून अमरची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक बाब समोर आली. त्यानुसार गुन्हे शाखेच्या पथकाने तपास आरंभला.
 
 
तपासात काही दिवसांपूर्वी महादेवखोरी येथील काही तरुणांनी एकाची हत्या करून त्याचा मृतदेह विहिरीत फेकला होता, अशी माहिती समोर आली. त्या आधारावर गुन्हे शाखेच्या पथकाने या गुन्ह्याचा उलगडा केला. आरोपी आदेश तेलमोरे याचे अमरकडे उसनवारी म्हणून दिलेले पैसे होते. त्या कारणावरून आरोपींनी त्याला मालखेड मार्गावरील जंगलात नेत लाठी व चाकूने मारहाण करून त्याची हत्या केली. त्यानंतर त्याचा मृतदेह विहिरीमध्ये फेकल्याचे तपासात पुढे आले. ही कारवाई गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संदीप चव्हाण यांच्या नेतृत्वात साहाय्यक पोलिस निरीक्षक मनीष वाकोडे व महेश इंगोले, पोलिस उपनिरीक्षक गजानन सोनुने, सुनील लासुरकर, फिरोज खान, सतीश देशमुख, दीपक सुंदरकर, गजानन ढेवले, मनोज ठोसर, आस्तिक देशमुख, जहीर शेख, सचिन बहाळे, मंगेश लोखंडे, प्रशांत मोहोड, विकास गुडधे, अतुल संभे, मिर्झा नईम बेग, नाझीमोद्दीन सय्यद, विशाल वाकपांजर, सागर ठाकरे, रणजित गावंडे, राजीक रायलीवाले, सूरज चव्हाण, निखिल गेडाम, योगेश पवार यांनी केली.
Powered By Sangraha 9.0