Anjangaon: Case of answer sheet theft संपूर्ण राज्यात खळबळ माजवून देणार्या २७ फेब्रुवारी २०२६ रोजीच्या शालांत परीक्षा पेपर फुटी आणि चोरी प्रकरणात पोलिसांनी तपासाचा फास अधिक घट्ट केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी आणखी दोन अल्पवयीन विद्यार्थ्यांसह एका पालकाला ताब्यात घेतले असले तरी विस्तार अधिकारी सुशील अंभ्यकर आणि एक पालक अद्याप फरार आहे. दरम्यान, मुख्य आरोपी असलेला गटशिक्षणाधिकारी सुधीर खोडे याला तात्काळ प्रभावाने निलंबित करण्यात आले आहे. या कारवाईमुळे शिक्षण विभागात मोठी खळबळ उडाली आहे.
विद्यार्थ्यांनी घरी बसून पेपर लिहिला असल्याचे पोलिस तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. चोरीला गेलेला पेपर या विद्यार्थ्यांनी चक्क आपापल्या घरी बसून लिहिल्याचे निष्पन्न झाले आहे. यातील एका अल्पवयीन आरोपी विद्यार्थ्याची आई नगरसेविका असल्याची माहिती समोर आल्याने या प्रकरणाला राजकीय वलय प्राप्त झाले आहे. या विद्यार्थ्यांकडे पेपर कसा पोहोचला आणि त्यात कोणाचे आर्थिक हितसंबंध गुंतलेले आहेत, याचा शोध पोलिस घेत आहेत.