chemical-free tomatoes टोमॅटो हा भारतीय स्वयंपाकघरातील अत्यंत महत्त्वाचा भाजीपाला मानला जातो. सलाडपासून ते विविध भाज्या आणि ग्रेव्हीपर्यंत अनेक पदार्थांमध्ये टोमॅटोचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. मात्र सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या अनेक टोमॅटोवर रासायनिक खतांचा आणि कीटकनाशकांचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात असल्याची चिंता व्यक्त केली जाते. अशा परिस्थितीत घरीच सेंद्रिय पद्धतीने टोमॅटोची लागवड करणे हा सुरक्षित आणि उत्तम पर्याय ठरू शकतो.
तज्ज्ञांच्या मते, थोडेसे नियोजन आणि योग्य पद्धत अवलंबली तर घरच्या घरी ताजे, रसाळ आणि केमिकलमुक्त टोमॅटो सहज पिकवता येतात. सर्वप्रथम चांगल्या दर्जाचे बियाणे निवडणे महत्त्वाचे असते. विश्वासार्ह कंपनी किंवा दुकानातून हायब्रिड किंवा चांगल्या प्रतीची बियाणे घेतल्यास रोपांची वाढ चांगली होते.बियाणे पेरण्यापूर्वी ती सुमारे २४ तास पाण्यात भिजवून ठेवावीत. त्यानंतर ती ओल्या कापडात गुंडाळून ५ ते ६ दिवस ठेवल्यास त्यांना लहान अंकुर फुटतात. अंकुर फुटल्यानंतर लागवडीसाठी सुपीक माती तयार करावी. यासाठी सुमारे ४० टक्के बागेची माती, ३० टक्के शेणखत आणि ३० टक्के कोकोपीट एकत्र मिसळून माती तयार केली जाते.
लागवडीसाठी chemical-free tomatoes किमान १२ ते १४ इंच खोल कुंडी किंवा ग्रो बॅग निवडावी. अंकुरलेली रोपे साधारण ४ ते ५ इंच उंच झाल्यावर त्यांना मोठ्या कुंडीत काळजीपूर्वक हलवावे. रोपांची योग्य वाढ होण्यासाठी दररोज किमान सहा तास सूर्यप्रकाश मिळणे आवश्यक असते. त्यामुळे बाल्कनी, टेरेस किंवा अंगण हे लागवडीसाठी योग्य ठिकाण मानले जाते.रोपांना नियमित पाणी देणे देखील महत्त्वाचे आहे. माती पूर्णपणे कोरडी होऊ नये याची काळजी घ्यावी, मात्र जास्त पाणी देणे टाळावे. साधारणपणे आठवड्यातून तीन ते चार वेळा पाणी देणे पुरेसे ठरते. रोप वाढत असताना त्याला आधार देण्यासाठी लाकडी काठी किंवा दोरीचा वापर करावा.कीटक आणि बुरशीपासून संरक्षणासाठी दर १० ते १५ दिवसांनी कडुलिंबाच्या तेलाची फवारणी करणे उपयुक्त ठरते. तसेच केळीच्या सालीचे पाणी, ताक किंवा गांडूळखत यांसारखी सेंद्रिय खते दर पंधरा दिवसांनी दिल्यास रोपांची वाढ चांगली होते.टोमॅटो पूर्णपणे लाल, चमकदार आणि मध्यम आकाराचे झाल्यावर ते काढणीसाठी तयार होतात. योग्य काळजी घेतल्यास घरच्या घरी उगवलेले टोमॅटो केवळ आरोग्यासाठी सुरक्षित नसतात, तर चवीनेही अधिक ताजे आणि पौष्टिक असतात.
(डिस्क्लेमर : या लेखात दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. कोणतीही पद्धत अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)