देवगिरीवर २० आमदारांची सुनेत्रा पवारांशी गुप्त चर्चा

05 Mar 2026 12:00:20
मुंबई,
MLAs have secret discussions with Sunetra राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेत झालेल्या मृत्यूनंतर या घटनेभोवती अनेक प्रश्न निर्माण झाले असून संशयाचे वातावरण अधिक गडद होत आहे. या प्रकरणात आमदार रोहित पवार यांनी नागरी उड्डाण नियंत्रण यंत्रणा आणि संबंधित कंपनीवर गंभीर आरोप करत हा अपघात केवळ दुर्घटना नसून त्यामागे घातपात असण्याची शक्यता व्यक्त केली आहे. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडून सातत्याने केली जात आहे.

MLAs have secret discussions with Sunetra
 
 
याच पार्श्वभूमीवर मुंबईतील देवगिरी बंगल्यावर महत्त्वाची राजकीय हालचाल घडली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वीसपेक्षा अधिक आमदारांनी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांची भेट घेतली. या भेटीत अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेबाबत सादर करण्यात आलेल्या अहवालावर सविस्तर चर्चा झाली. काही आमदारांनी या अहवालात अनेक त्रुटी असल्याचे सांगत त्याबाबत शंका व्यक्त केल्या. या प्रकरणाची स्वतंत्र आणि सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी बैठकीत पुन्हा एकदा जोरकसपणे मांडण्यात आली. सुनेत्रा पवार यांनी काही दिवसांपूर्वीच या दुर्घटनेची चौकशी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाकडून करावी, अशी मागणी करणारे पत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले होते. त्या मागणीबाबत पुढे काय निर्णय झाला याबाबत मुख्यमंत्र्यांना थेट विचारणा करण्याचा सल्लाही काही आमदारांनी बैठकीत दिला. यावर सुनेत्रा पवार यांनी लवकरच सर्वजण एकत्र जाऊन मुख्यमंत्र्यांची भेट घेण्याचे आश्वासन दिल्याचे सांगितले जात आहे.
 
बैठकीदरम्यान देवगिरी बंगल्यावर आलेल्या प्रत्येक आमदाराशी सुनेत्रा पवार यांनी स्वतंत्रपणे चर्चा केल्याची माहिती मिळते. या संवादामध्ये आमदारांनी आपल्या शंका आणि निरीक्षणे त्यांच्यासमोर मांडली. मात्र या चर्चेचा तपशील अद्याप बाहेर आलेला नाही. दरम्यान, अजित पवार यांच्या अपघातानंतर घटनास्थळावरून मिळालेल्या काही वस्तूही सुनेत्रा पवार यांनी आमदारांना दाखवल्या. त्यामध्ये त्यांची चप्पल आणि घड्याळ यांचा समावेश होता. या वस्तूंविषयीही बैठकीत चर्चा झाली. देवगिरी बंगल्यावर झालेली ही बैठक आणि त्यानंतर वाढलेल्या राजकीय हालचालींमुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात सध्या घडामोडींना वेग आला आहे. त्यामुळे अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेचा तपास आणि त्याभोवतीचे प्रश्न येत्या काळात अधिक तीव्रतेने चर्चेत येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
Powered By Sangraha 9.0