वेध
रेवती जोशी-अंधारे
9850339240
mossad israels देशविदेशातील गुप्तहेर यंत्रणांचे स्वत:चे असे जग आहे. त्या जगात विविध पातळ्यांवर सतत संघर्ष सुरू असतो. धुरंधर चित्रपटामुळे हा संघर्ष काही अंशी जनतेसमोर आला आणि त्या संघर्षातून मिळणारे यश ऑपरेशन सिंदूरने दाखविले. अमेरिका-इस्रायल विरुद्ध इराण विरुद्ध आखाती देश असे गुंतागुंतीच्या समीकरणांचे महायुद्ध सध्या सुरू आहे. अद्याप ते विश्वयुद्धाच्या व्याख्येत बसलेले नाही. लष्करी तळांवर हवाई हल्ले करता करता, आर्थिक आणि मनोवैज्ञानिक स्तरावर सर्जिकल स्ट्राईक करण्यात सर्वच सहभागी देश अग्रेसर आहेत. मध्य-पूर्वेतील शांतता, आर्थिक स्थैर्य, व्यापार आणि दैनंदिन जीवनमान ढवळून काढणाऱ्या एकमेव घटनेमागे इस्रायलच्या अज्ञात धुरंधरांची किमान 3 ते 4 वर्षांची मेहनत आहे. त्यांचे राष्ट्रप्रेम आणि परिणामकारक रहस्यमयी कारवायांचा वेध घेणे आवश्यक आहे.
ईराणच्या सर्वोच्च नेत्यासह त्याचे कुटूंब, प्रमुख सहकारी वगैरे मंडळींना जन्नत मध्ये धाडणाऱ्या हल्ल्याचे नियोजन आता उघड होत आहे. आपल्या रॉ सारखी इराणची मोसाद ही संस्था आहे. गुप्त माहिती व विशेष कार्य संस्था असा अर्थ असलेला मोसाद हा शब्द मूळत: हिब्रू भाषेतील आहे. आक्रमक इस्लामिक राष्ट्रांनी वेढलेल्या इस्रायलच्या राष्ट्रीय सुरक्षेत मोसादची भूमिका नेहमीच राहिली. या संस्थेच्या कारवायांभोवती गूढता, धाडस, वाद आणि राजकारणाचे वलय राहिले आहे.
मोसादची स्थापना 1949 मध्ये इस्रायलचे पहिले पंतप्रधान डेव्हिड बेन गुरीओन् यांच्या पुढाकाराने झाली. हेरगिरीसोबतच जगभरातील ज्यू समुदायाच्या सुरक्षेसाठी मदत करणे, ही मोसादची आजन्म प्राथमिकता राहिलेली आहे. वर्ष 1960 च्या नाझी अधिकारी अॅडॉल्फ आयखमन पकड मोहीमेनंतर मोसाद चर्चेत आली. मोसादने आयखमनला अर्जेंटिनामध्ये गुप्त कारवाई करून पकडून इस्रायलमध्ये आणले. हे मोसादच्या इतिहासातील सर्वात गाजलेले ऑपरेशन ठरले.
1972 मध्ये म्युनिच ऑलिंपिक्स हत्याकांडानंतर ईश्वराचा वाईटाविषयीचा संताप ऑपरेशन अर्थात रॅथ ऑफ गॉड हे 1-2 नाही तर जगाच्या कानाकोपऱ्यातील दहशतवाद्यांविरोधात सर्जिकल स्ट्राईक ठरले. त्यानंतर, वर्ष 1976 मध्ये ऑपरेशन एंटेबे करून, युगांडातील एंटेबे विमानतळावर ओलीस ठेवलेल्या प्रवाशांची सुटका करण्यात आली. या कारवाईने इस्रायलच्या लष्करी आणि गुप्तहेर क्षमतेचे जगाला दर्शन घडवले आणि या कारवाईत भावाला गमविणारे बेंजामिन नेतान्याहू यांचा इस्रायलच्या राजकारणात उदय झाला.
इराणमधील अनेक अणुशास्त्रज्ञांवर गेल्या दशकात हल्ले झाले. विशेषतः 2020 मध्ये मोहसिन फख्रीजदेह यांच्या हत्येने जगाचे लक्ष वेधले. या कारवाईमागे मोसाद असल्याचा आरोप करण्यात आला जरी, याची इस्रायलने अधिकृत कबुली कधीच दिली नाही. तत्पूर्वी, 2018 मध्ये इस्रायलचे पंतप्रधान यांनी जाहीर केले की, मोसादने तेहरानमधून इराणच्या अणुकार्यक्रमाशी संबंधित गुप्त कागदपत्रे हस्तगत केली. या दाव्यामुळे इराणची सुरक्षा यंत्रणा आणि नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उभे राहिले. या सर्व कारवाया थेट कोण्या एका व्यक्तीवर नसल्या तरी त्यांच्या धोरणात्मक आधारस्तंभांवर प्रहार करणाऱ्या नक्कीच होत्या.
मोसादची कार्यपद्धती अत्यंत गोपनीय असून तांत्रिक गुप्तहेरगिरी, सायबर हेरगिरी आणि मानवी स्रोतांचा गरजेनुसार वापर केला जातो. या संस्थेचा प्रमुख थेट इस्रायलच्या पंतप्रधानांना अहवाल देतो. मोसादच्या अनेक कारवाया आंतरराष्ट्रीय कायद्याच्या दृष्टीने वादग्रस्त ठरल्या आहेत. लक्ष्यित हत्याकांड, परदेशी सार्वभौमत्वाचे उल्लंघन आणि गुप्त कारवाया यांवरून अनेक देशांनी टीका केली तरीही इस्रायलच्या दृष्टीने त्या राष्ट्रीय सुरक्षेसाठी आवश्यक मानल्या जातात. इस्रायल-इराण संघर्षाच्या पटावरील अदृश्य मोहरा म्हणजे मोसाद!
अमेरिका आणि इस्रायलने नुकत्याच केलेल्या कारवाईमागे मोसाद सक्रीय होते आणि आहे, हे उघड सत्य आहे. या कारवाईची सुरुवात एका रात्रीतून झालेली नाही तर किमान 3 वर्षांपासून मोसादची यंत्रणा कार्यरत असावी, हे तज्ज्ञांचे मत आहे. इराणच्या शहरांमध्ये ट्राफीक कॅमेऱ्याची यंत्रणा साधारण वर्षभरापासून हॅक झाली होती. ईराणवरील हल्ल्यांच्या तासभर आधी मोबाईल टॉवर्सची यंत्रणा हॅक होऊन कोलमडली.mossad israels महत्त्वाच्या व्यक्तींचे मोबाईल बिझी येऊ लागले. जगभरातील ईराणी मुसलमानांना धार्मिक उपक्रमांची, नमाजच्या वेळांची माहिती देणारे बद-ए-सबा नावाचे अॅप, अमेरिकन हल्ल्यांनंतर हॅक झाले आणि त्यावरून हेल्प इज हिअर अर्थात मदत तुमच्यापर्यंत पोहचली आहे, हा संदेश व्हायरल झाला. या सगळ्यांमागे कोणती अदृश्य शक्ती आहे, हे सुज्ञांस सांगणे न लगे!
मोसाद ही केवळ गुप्तहेर संस्था नाही, तर इस्रायलच्या अस्तित्वाशी निगडित सुरक्षाकवच आहे. मोसाद म्हणजे राष्ट्रसुरक्षेच्या उद्देशाने चालणाऱ्या अदृश्य युद्धाची कथा जी जगाच्या पडद्यामागे सतत सुरू असते. मध्यपूर्वेतील राजकारण हे उघड युद्धांपेक्षा अधिक धोकादायक अशा छुप्या संघर्षांवर उभे आहे. मोसादचा हा संघर्ष बंदुकीच्या आवाजाशिवाय चालणारे युद्ध आहे, ज्यात गोळ्या दिसत नाहीत, पण परिणाम दूरगामी असतात. मध्यपूर्वेतील स्थैर्य या अदृश्य रणांगणावरच ठरणार आहे, हे नक्की!