माझ्या ‌‘कृष्णा‌’साठी मला जगायचे आहे

05 Mar 2026 15:54:34
पराग मगर
नागपूर,
raulgaon-blast-vaishali-dhurve : मी लवकरच बरी होऊन घरी येणार आहे. तुम्ही माझ्या मुलाची काळजी घ्या. मला माझ्या ‌‘कृष्णा‌’साठी जगायचे आहे, अशी भावना राऊळगाव स्फोटातील जखमी वैशाली धुर्वे आपल्या बहिणीजवळ व्यक्त करीत आहे.
 
 
vaishali-dhurve
 
 
 
30 वर्ष वय असलेली वैशाली जवळपास चार वर्षांपासून राऊळगाव येथील एसबीएल या स्फोटक निर्मिती करणाऱ्या कंपनीत काम करीत होती. रविवारी झालेल्या स्फोटात वैशालीचे हात पाय जळाले. बरीच दुखापत झाली आहे. तिला सात वर्षाचा कृष्णा हा मुलगा आहे. तिची बहीण करुणा कोडापे यांनी दिलेल्या माहितीनुसार लग्नानंतर तिला नवरा खूप त्रास द्यायचा. मारझोड करायचा. त्यामुळे नवऱ्याच्या जाचाला कंटाळून मुलाला घेऊन ती माहेरी धुरखेडा येथे राहायला आली. दोन वर्षांपूर्वी तिची सोडचिठ्ठी झाली.
 
आईवडीलही म्हातारे आहेत. बहीण करुणाही याच गावात राहते. त्यामुळे कुटुंबाच्या साथीने ती या कंपनीत काम करीत होती. आपल्या मुलासाठीच ती जमेल ती मेहनत करीत होती. मुलाने शिकून मोठं व्हावं यासाठीच कंपनीत ती काम करीत होती. त्यामुळेच त्याच्यासाठीच जगायचं आहे आणि आपण जगणार हा ठाम विश्वास तिला आहे.
 
आईला काय झालं हे चिमुकल्यालाही कळतं
 
 
जळालेल्या रुग्णांवर खामला येथील ऑरेंज सिटी रुग्णालयात उपचार सुरू आहे. आईला काय झालं हे कृष्णाला माहिती आहे का असे विचारले असता करुणा सांगतात, मुलाला दाखविता येईल अशी स्थिती नाही. तो घाबरू शकतो. पण आजकालच्या मुलांना सगळं कळत. त्यालाही या स्फोटाविषयी माहिती आहे आणि तो बोलत नसला तरी आईला काही तरी झालय हे त्याला माहिती आहे असे करुणा म्हणाल्या.
Powered By Sangraha 9.0