तिसऱ्या महायुद्धाची चाहूल? रशियाचा अमेरिकेला थेट इशारा

05 Mar 2026 11:28:28
मॉस्को,
Russia's direct warning to America मध्यपूर्वेत वाढत चाललेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर रशियाने अमेरिकेला कठोर इशारा दिला आहे. इराण-इस्रायल संघर्षामुळे परिस्थिती अधिकच चिघळत असताना रशियाच्या नेतृत्वाने या संघर्षातून तिसऱ्या महायुद्धाची शक्यता निर्माण होऊ शकते, असे स्पष्ट संकेत दिले आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इस्रायलच्या मदतीने इराकमध्ये केलेल्या लष्करी कारवाईमुळे मध्यपूर्वेतील वातावरण अधिक तणावपूर्ण झाले असून जागतिक स्तरावर चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या घडामोडींवर प्रतिक्रिया देताना रशियाने अमेरिकेच्या धोरणांवर तीव्र टीका केली आहे.
 
 

Russia
 
रशियाच्या सुरक्षा परिषदेचे उपाध्यक्ष दिमित्री मेदवेदेव यांनी एका मुलाखतीत अमेरिकेच्या भूमिकेवर कठोर शब्दांत निशाणा साधला. त्यांनी सांगितले की, जर अमेरिकेने इतर देशांमध्ये राजकीय व्यवस्था बदलण्यासाठी आक्रमक आणि बेकायदेशीर मार्गांचा अवलंब सुरूच ठेवला, तर परिस्थिती अधिक धोकादायक बनू शकते. अशा प्रकारच्या कृतींमुळे जागतिक संघर्ष भडकण्याची शक्यता असून त्यातून तिसऱ्या महायुद्धाला सुरुवात होऊ शकते, असा इशाराही त्यांनी दिला.
 
मेदवेदेव यांनी असेही नमूद केले की जगात आपले वर्चस्व टिकवण्यासाठी अमेरिका आणि तिचे सहयोगी देश युद्धजन्य परिस्थिती निर्माण करत आहेत. त्यांच्या मते, कोणतीही छोटी घटना देखील मोठ्या संघर्षाला कारणीभूत ठरू शकते. त्यामुळे सध्याची परिस्थिती अत्यंत संवेदनशील असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, इराण आणि इस्रायल यांच्यातील वाढत्या संघर्षामुळे मध्यपूर्वेतील अस्थिरता अधिक वाढली आहे. इराणने अद्याप पूर्ण क्षमतेने प्रत्युत्तर दिलेले नसले तरी ते योग्य वेळी प्रतिक्रिया देऊ शकतात, असे मेदवेदेव यांनी म्हटले. इराणचा इतिहास आणि संस्कृती प्राचीन असल्यामुळे ते संयमाने परिस्थितीकडे पाहतात, परंतु आवश्यकतेनुसार कठोर पावले उचलण्याची त्यांची तयारी असते, असेही त्यांनी सांगितले. या पार्श्वभूमीवर मध्यपूर्वेतील संघर्ष अधिक तीव्र होण्याची भीती व्यक्त केली जात असून जागतिक स्तरावर परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. तणाव वाढत राहिल्यास त्याचे परिणाम संपूर्ण जगावर होऊ शकतात, अशीही चिंता व्यक्त केली जात आहे.
Powered By Sangraha 9.0