अन्त्ययात्रेतील नागरिकांवर मधमाशांचा हल्ला

06 Mar 2026 20:05:38
वर्धा, 
bees-attack : हिंगणघाट तालुयातील अल्लीपूर येथे अन्त्ययात्रेत सहभागी झालेल्या नागरिकांवर मधमाशांनी अचानक हल्ला केला. या घटनेमुळे एकच तारांबळ उडाल्यावर अन्त्ययात्रेतील नागरिकांना स्वत:चा जीव वाचविण्यासाठी तिरडीवरील पार्थिव स्मशानभूमीच्या वाटेतच सोडून पळ काढावा लागला. या घटनेत ३० जणांना मधमाशांनी दंश केला. त्यापैकी ६ जणांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात आले.
 
 
kjl
 
 
 
अल्लीपूर येथील वसंत बेले यांचे निधन झाले. त्यांची अन्त्ययात्रा त्यांच्या राहत्या निवासस्थानावरून काढण्यात आली. अन्त्ययात्रा मोक्षधामात पोहोचल्यानंतर परंपरेनुसार अन्त्यसंस्काराची प्रक्रिया सुरू करण्यात आली. विसावाची विधी सुरू असताना आकटेच्या मडयातील धुरामुळे जवळच्या झाडावर असलेल्या मधमाशांच्या पोळ्यात हालचाल झाली आणि चिडलेल्या मधमाशांनी नागरिकांवर जोरदार हल्ला चढवला. यामुळे एकच खळबळ उडाली. अन्त्ययात्रेत सहभागी नागरिकांनीही स्वत:ला मधमाश्यांपासून वाचविण्यासाठी मृतदेह सोडून पळ काढला. सुमारे दीड ते दोन तास कोणीही परत जाण्याची हिंमत करू शकले नाही. काही वेळानंतर परिस्थिती नियंत्रणात आल्याचे पाहून काहींनी धाडस करून पुन्हा अन्त्यसंस्काराची प्रक्रिया पूर्ण केली.
 
 
या घटनेत ३० व्यतिंना मधमाशांनी दंश केला. त्यापैकी २४ जणांवर अल्लीपूर ग्रामीण आरोग्य केंद्रात उपचार करून त्यांना सुटी देण्यात आली. तर वामन पिंपलापुरे, रामदास बेले, सतीश खोंड, महेंद्र बेले, उमेश बेले आणि गजानन बेले हे गंभीर जखमी झाले. त्यांना सेवाग्राम येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
Powered By Sangraha 9.0