मेहनत गंभीरची पण धोनीच ठरला चर्चेचा विषय!

06 Mar 2026 12:25:35
नवी दिल्ली,
Dhoni topic of discussion गतविजेत्या भारतीय संघाने गुरुवारी मुंबईतील वानखेडे स्टेडियम येथे झालेल्या टी-२० विश्वचषकाच्या उपांत्य सामन्यात इंग्लंडवर सात धावांनी रोमहर्षक विजय मिळवत अंतिम फेरीत प्रवेश केला. भारताने दिलेल्या २५४ धावांच्या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडच्या फलंदाजांनी जोरदार प्रतिकार केला. विशेषतः मधल्या फळीतील जेकब बेथेल याने दमदार शतक झळकावत सामन्यात रंगत आणली. मात्र भारतीय गोलंदाजांनी शेवटपर्यंत संयम आणि अचूक मारा कायम ठेवत सामना आपल्या बाजूने फिरवला. या विजयामुळे भारताचा अंतिम सामना आता अहमदाबाद येथे न्यूझीलंडविरुद्ध होणार आहे.
 
 

dhoni and gambhir  
 
सामन्यानंतर मैदानावर आणि प्रेक्षकांमध्ये जल्लोषाचे वातावरण होते. भारतीय संघाच्या या विजयात मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्या नियोजनाची मोठी भूमिका असल्याची चर्चा होत असतानाच स्टेडियममधील कॅमेरे मात्र माजी कर्णधार एमएस धोनी यांच्या उपस्थितीकडेच अधिक वळलेले दिसले. धोनी प्रेक्षकांमध्ये दिसताच चाहत्यांनी जोरदार घोषणाबाजी करत आनंद व्यक्त केला. त्यामुळे अनेकांनी मेहनत गंभीर यांची, पण चर्चा धोनी यांची अशा प्रतिक्रिया व्यक्त केल्या.
 
 
या सामन्यात मैदानावरील थरार जितका प्रेक्षकांना खिळवून ठेवणारा होता, तितकीच उत्सुकता धोनी यांच्या उपस्थितीमुळेही निर्माण झाली होती. भारताच्या विजयासोबतच सामाजिक माध्यमांवर “थाला फॉर अ रीझन” हा वाक्यप्रचार पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात चर्चेत आला. क्रिकेटप्रेमींमध्ये हा वाक्यप्रचार आता एक लोकप्रिय विनोदी संकेत म्हणून ओळखला जातो. धोनी यांच्या अंगावरील जर्सीवरील सात क्रमांक आणि चेन्नई सुपर किंग्ज या संघाच्या चाहत्यांमध्ये त्यांना दिल्या जाणाऱ्या “थाला” या सन्माननीय संबोधनाशी त्याचा संबंध जोडला जातो. भारताने इंग्लंडवर नाट्यमय विजय मिळवल्यानंतर अनेकांनी धोनी यांच्या उपस्थितीलाच शुभसंकेत मानत सामाजिक माध्यमांवर मोठ्या प्रमाणात संदेश प्रसिद्ध केले. त्यामुळे “थाला फॉर अ रीझन” हा संकेत शब्द रात्रीभर चर्चेत राहिला आणि भारतीय संघाच्या विजयाबरोबरच धोनी यांची उपस्थितीही चाहत्यांमध्ये विशेष चर्चेचा विषय ठरली.
Powered By Sangraha 9.0