मुंबई,
gambhir-and-surya वानखेडे स्टेडियम येथे गुरुवारी सायंकाळी रंगलेला सामना एखाद्या चित्रपटातील उत्कंठावर्धक प्रसंगासारखा ठरला. भारत आणि इंग्लंड यांच्यात झालेल्या या उपांत्य सामन्यात भारताने सात धावांनी विजय मिळवत आयसीसी पुरुष टी-२० विश्वचषक २०२६च्या अंतिम फेरीत धडक मारली. आता ८ मार्च रोजी भारताचा सामना न्यूझीलंडशी होणार आहे. मात्र या विजयामागे फक्त धावांची कामगिरी नसून संघाचे मार्गदर्शक गौतम गंभीर आणि कर्णधार सूर्यकुमार यादव यांनी आखलेल्या दोन अनपेक्षित डावपेचांचा मोठा वाटा असल्याची चर्चा रंगली आहे.

सामन्यादरम्यान इंग्लंडचा फिरकी गोलंदाज आदिल रशीद अचूक गोलंदाजी करत भारतीय फलंदाजांवर दबाव आणत होता. त्याच वेळी गंभीर यांनी सर्वांना आश्चर्यचकित करत शिवम दुबे याला चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी पाठवण्याचा निर्णय घेतला. दुबे फिरकी गोलंदाजांविरुद्ध मोठे फटके मारण्यात पारंगत असल्याची त्यांना खात्री होती. यापूर्वी नेदरलँड्सविरुद्धच्या सामन्यातही तो याच क्रमांकावर फलंदाजीला उतरून ६६ धावा करत सामनावीर ठरला होता. gambhir-and-surya या निर्णयाचा परिणाम लगेच दिसून आला. दुबेने आदिल रशीदवर आक्रमक फटकेबाजी करत इंग्लंडच्या गोलंदाजीवर दबाव आणला आणि त्यांच्या डावपेचांची दिशा पूर्णपणे बदलून टाकली.
याहून अधिक आश्चर्यकारक निर्णय म्हणजे संपूर्ण स्पर्धेत तिसऱ्या क्रमांकावर खेळणाऱ्या तिलक वर्मा याला थेट सातव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी पाठवण्यात आले. इतक्या खालच्या क्रमांकावर त्याला प्रथमच खेळताना पाहायला मिळाले. अखेरच्या षटकांमध्ये धावांचा वेग वाढवण्यासाठी धडाकेबाज फलंदाजाची गरज असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले जाते. तिलकनेही या विश्वासाला न्याय देत अवघ्या सात चेंडूत एकवीस धावा करत संघाच्या धावसंख्येला मोठी चालना दिली.
या सामन्यात भारताचा विजय केवळ सात धावांनी झाला. त्यामुळे तिलक वर्माने केलेल्या त्या छोट्या पण प्रभावी खेळीला विजय आणि पराभव यांच्यातील फरक मानले जात आहे. gambhir-and-surya गंभीर यांनी आखलेल्या या डावपेचांची तुलना बुद्धीबळातील चालींशी केली जात असून समालोचक मंडळात बसलेल्या माजी क्रिकेटपटूंनाही हा निर्णय पाहून आश्चर्याचा धक्का बसला. उपांत्यसारख्या महत्त्वाच्या सामन्यात फलंदाजीच्या क्रमात इतका मोठा बदल होईल, अशी अपेक्षा कुणालाही नव्हती.
मात्र गंभीर आणि सूर्यकुमार यादव यांच्या नियोजनाने हा डाव अचूक ठरला आणि भारतीय संघाने विजय संपादन केला. आता सर्वांचे लक्ष ८ मार्च रोजी होणाऱ्या भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील अंतिम सामन्याकडे लागले आहे. त्या लढतीत भारत पुन्हा एकदा विजेतेपद मिळवण्यासाठी मैदानात उतरणार आहे.