मोठी घोषणा! मुंबईत भारताची पहिली आंतरराष्ट्रीय एज्युसिटी

06 Mar 2026 15:49:37
मुंबई
Maharashtra budget 2026-27 महाराष्ट्र राज्याचा २०२६-२७ या वर्षाचा अर्थसंकल्प आज विधानसभेत सादर करण्यात आला. या अर्थसंकल्पात शेतकरी, महिला, क्रीडा, शिक्षण यांसह विविध क्षेत्रांसाठी विशेष तरतुदी करण्यात आल्या आहेत. विशेषतः शिक्षण क्षेत्रासाठी राज्य सरकारने महत्त्वाकांक्षी योजना जाहीर केल्या आहेत, ज्यातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधण्याचा आणि महाराष्ट्राला जागतिक शैक्षणिक केंद्र बनवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
 

Maharashtra budget 2026-27  

कोणते उपक्रम?
अर्थसंकल्पात महत्त्वाच्या घोषणांमध्ये नवी मुंबईत भारताची पहिली आंतरराष्ट्रीय एज्युसिटी (International Edu-City) उभारण्याचा मानस व्यक्त करण्यात आला आहे. यासाठी अमेरिका, ब्रिटन, इटली आणि ऑस्ट्रेलिया या देशांतील सहा नामवंत आंतरराष्ट्रीय विद्यापीठांशी सामंजस्य करार (MoU) करण्यात आले आहेत. या एज्युसिटीमध्ये अभ्यासक्रम २०२६ पासून सुरू होणार असून, विद्यार्थ्यांना परदेशात न जाता महाराष्ट्रातच जागतिक दर्जाची पदवी घेता येणार आहे.
विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची आवड वाढवण्यासाठी मुख्यमंत्री विज्ञान वारी हा उपक्रम राबविला जाणार आहे. राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनात प्रगती करणाऱ्या विद्यार्थ्यांना केवळ बक्षिसे नाही, तर इस्रो (ISRO) आणि नासा (NASA) या संस्थांमध्ये अभ्यास करण्याची संधी मिळेल. यासाठी बक्षीस रक्कमेतही लक्षणीय वाढ करण्यात आली आहे.
 
 
शैक्षणिक सुधारणा केवळ Maharashtra budget 2026-27 पदवीपुरती मर्यादित राहणार नाहीत, तर किमान ८० टक्के पदवीधारकांना रोजगार मिळवणे हा उद्देश ठेवण्यात आला आहे. यासाठी राज्यात प्रतिभा केंद्रे (Talent Hubs) उभारली जातील. अमरावतीत डॉ. पंजाबराव देशमुख शैक्षणिक संकुल उभारले जाईल, ज्यामुळे विभागातील सर्व शैक्षणिक कार्यालये एकाच ठिकाणी कार्यरत राहतील आणि प्रशासकीय कामात सुसूत्रता येईल.राज्यात ८ ते १० विशेष शैक्षणिक केंद्रे उभारली जाणार आहेत, ज्यामुळे राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना आकर्षित करता येईल. यासोबतच प्राथमिक शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी आणि गळती रोखण्यासाठी विशेष तरतुदी केल्या आहेत, तसेच १०० टक्के मूलभूत साक्षरता आणि संख्याज्ञान प्राप्त करणे हा राज्य सरकारचा ध्येय आहे.या घोषणांमुळे महाराष्ट्रातील शिक्षण क्षेत्रात मोठा बदल घडवून आणण्याचे उद्दिष्ट साधले जाणार आहे, ज्यातून विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे शिक्षण आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील.
Powered By Sangraha 9.0