संजय रामगिरवार
चंद्रपूर,
mpcb-mri-chandrapur : गंभीर आजाराचे निदान करणारे ‘एमआरआय’ यंत्र अजूनही चंद्रपूरच्या शासकीय आरोग्य यंत्रणेला सुरूच करता आले नाही! खरे तर, ते 2015 लाच सुरू होणार होते, पण अनेक कारणांनी ते रखडत गेले. तेव्हा साडेसात कोटीत मिळणारे ‘एमआरआय’ गेल्यावर्षी तब्बल 16 कोटीत घ्यावे लागले. पण तरीही कागदपत्रांअभावी अद्याप ते बंद आहे! आता म्हणे, ‘एमपीसीबी’च्या परवान्यासाठी ते रखडले आहे. जवळजवळ एक तप होत आहे. गरीब रुग्णांची प्रतीक्षा काही संपली नाही!
शिर्डी येथील ‘श्री. साई संस्थान’ने 2015 मध्येच ‘एमआरआय’ विकत घेण्यासाठी साडेसात कोटी रूपये दिले होते. तेव्हाच हे यंत्र स्थापित होऊ शकले असते. पण जिल्हा सामान्य रूग्णालयात जागेच्या व आवश्यक संसाधनांच्या अभावाने ही प्रक्रिया प्रलंबित राहिली. पुढे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या नव्या इमारतीचे बांधकाम लांबले आणि त्यामुळे हे यंत्रही!
शेवटी, श्री. साई संस्थानचे साडेसात कोटी आणि त्यात खनिज विकास निधीच्या 8 कोटी 43 लाख 13 हजार 931 रूपयांची भर घालत, एकूण 15 कोटी 93 लाख 13 हजार 931 रूपयांचे ‘एमआरआय’ यंत्र प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर गतवर्षीच्या सप्टेंबर महिन्यात चंद्रपुरात दाखल झाले. एवढे करूनही ते कागदपत्रांच्या पूर्ततेसाठी ठप्प पडले आहे. कारण त्यासाठी लागणारा ‘पीसीपीएनडीटी’चा परवाना रखडला आहे. या परवान्यासाठी आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील सल्लागार समितीने ‘एमआरआय’ जेथे स्थापित व्हायचे होते त्या ठिकाणची म्हणजे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या नव्या इमारतीची पाहणी केली आणि सहमतीही दर्शवली. मात्र, त्यासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता चंद्रपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मिलिंद कांबळी यांच्याकडून झाली नसल्याने परवाना देता येत नाही, असे स्पष्टीकरण मनपाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. नैना उत्तरवार यांनी दिले आहे.
‘एमआरआय’ एकदा स्थापित केले तर ते दुसरीकडे हलवता येत नाही. कारण त्या यंत्राचे तांत्रिक मुल्य संपते आणि म्हणून 2015 पासून नव्या इमारतीच्या बांधकामाची वाट पाहिली जात होती. आणि आता विविध परवान्यांची वाट पाहिली जात आहे. अर्थात, शासकीय दिरंगाई, लालफिताशाही आणि असंवेदनशीतेमुळे चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ, तेलंगानाच्या सिमारेषेवरील गावांतून चंद्रपुरात वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी येणार्या गरिब रूग्णांना ‘एमआरआय’साठी गेली 11 वर्ष खाजगी रूग्णालयांचे उंबरठे झिजवावे लागत आहे. आर्थिक भुर्दंड बसत आहे, तो वेगळाच!
‘एमपीसीबी’च्या परवान्याची वाट बघतोय: डॉ. मिलींद कांबळे
शासकीय रूग्णालयाच्या नव्या इमारतीत ‘एमआरआय’ मशीनचे ‘इंस्टॉलेशेन’ झाले आहे. पण ‘पीसीपीएनडीटी’चा परवाना असेपर्यंत हे यंत्र सुरू करता येत नाही. या परवान्यासाठी सर्व कागदपत्रांची गरज आहे. पण रुग्णालयाला महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाचा (एमपीसीबी) परवाना मिळालेला नाही. या परवान्याशिवाय ‘पीसीपीएनडीटी’च्या परवान्याचे कागदपत्र तयार होत नाही. आम्ही सध्या त्याचीच वाट बघतोय. एमपीसीबीच्या परवान्याची नस्ती मुंबईत गेली आहे, अशी माहिती अधिष्ठाता डॉ. मिलींद कांबळे यांनी तभाला दिली.