लढाऊ विमान दुर्घटनेत नागपूरचे स्क्वाड्रन लीडर पुरवेश दुरुगकर हुतात्मा!

06 Mar 2026 11:55:24
नागपूर,
Nagpur's Squadron Leader Purvesh Durugkar martyred आसाम राज्यातील कार्बी आंगलोंग जिल्ह्यात झालेल्या लढाऊ विमानाच्या भीषण अपघातात भारतीय हवाई दलातील दोन अधिकाऱ्यांना वीरमरण आल्याची घटना समोर आली आहे. या अपघातात नागपूर येथील तरुण वैमानिक स्क्वाड्रन लीडर पुरवेश दुरुगकर यांचे निधन झाले असून त्यांच्या निधनामुळे नागपूर शहरात शोककळा पसरली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भारतीय हवाई दलाचे अत्याधुनिक लढाऊ विमान सुखोई एसयू-३०एमकेआय गुरुवारी नियमित सराव उड्डाण करत असताना अचानक नियंत्रण कक्षाच्या रडारवरून गायब झाले. आसाममधील डोंगराळ आणि दाट जंगल असलेल्या कार्बी आंगलोंग भागावरून उड्डाण सुरू असतानाच विमानाचा जमिनीवरील नियंत्रण कक्षाशी संपर्क तुटला. संपर्क तुटल्यानंतर तातडीने शोध मोहीम सुरू करण्यात आली होती.
 
 
 

Nagpur 
काही वेळाने शोध पथकाला त्या परिसरात विमान अपघातग्रस्त झाल्याचे आढळून आले. मात्र या भीषण दुर्घटनेत विमानातील दोन्ही वैमानिकांचा मृत्यू झाला. या अपघातात स्क्वाड्रन लीडर अनुज आणि फ्लाइट लेफ्टनंट पुरवेश दुरुगकर यांनी प्राण गमावले. नागपूरच्या न्यू सुभेदार लेआऊट परिसरातील रहिवासी असलेले पुरवेश दुरुगकर हे अत्यंत कर्तबगार आणि देशसेवेची भावना असलेले तरुण अधिकारी म्हणून ओळखले जात होते. त्यांनी आपले शिक्षण शहापूर येथील शिक्षण संस्थेत पूर्ण केले होते. भारतीय हवाई दलात दाखल झाल्यानंतर त्यांनी विविध मोहिमांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली होती. देशसेवेत असताना त्यांचे झालेले बलिदान नागपूरसह संपूर्ण परिसरासाठी अत्यंत दुःखद आणि अभिमानाची बाब मानली जात आहे. त्यांच्या निधनाची बातमी समजताच कुटुंबीयांसह मित्रपरिवार आणि स्थानिक नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या पार्थिवावर लवकरच शासकीय सन्मानाने अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहितीही समोर येत आहे.
Powered By Sangraha 9.0