रिसोड,
deepak-badme : गेल्या शंभर वर्षांपासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हिंदू मध्ये भारतीय संस्कृती रुजवण्याचे कार्य करीत आहे.संघाच्या शताब्दी वर्षांमध्ये हिंदू धर्मियांनी समरसता,कुटुंब प्रबोधन, पर्यावरण,स्वदेशी, नागरी कर्तव्य या पंच परिवर्तनाचा विचार अंगीकारल्यास भारत विश्वगुरु झाल्याशिवाय राहणार नाही, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अकोला विभाग प्रचारक दीपक बडमे यांनी भर जहागीर येथील विशाल हिंदू संमेलनामध्ये केले.

यावेळी व्यासपीठावर पोहरादेवीचे महंत नेहरूजी महाराज, धर्म जागरण मंचाच्या जिल्हा संयोजका अॅड श्वेता खंडेलवाल, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विभाग दीपक बडमे उपस्थित होते. भारतमाता व छत्रपती शिवाजी महाराज प्रतिमा पूजन करून मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. यावेळी बोलताना धर्म जागरणच्या संयोजिका अॅड. श्वेता खंडेलवाल म्हणाल्या की आपल्या हिंदू धर्माचे संस्कार महिलांनी पुढील पिढीकडे संक्रमित करावे. नुसते शिक्षणाने शिक्षित न होता संस्काराने सुद्धा शिक्षित होणे गरजेचे आहे. हिंदू धर्माप्रमाणे पूजाअर्चा करावी. कपाळावर कुंकू किंवा टिकली लावावी.महिलांनी डोयाला रुमाल बांधताना हिंदू धर्माप्रमाणे बांधावा. आपले संस्कार चांगले असेल तर आपल्याकडे कोणीही तिरप्या नजरेने बघणार नाही याची महिलांनी काळजी घेणे गरजेचे आहे.
पोहरादेवीचे महंत नेहरूजी महाराज म्हणाले की सर्व हिंदू समाजाने एकत्रित आल्यास भारत विश्वगुरू झाल्याशिवाय राहणार नाही. भारत मातेचे आरती करून कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन धैर्यशील जोशी यांनी केले. कार्यक्रमाला भर जहागीर मधील मोठ्या संख्येने हिंदू धर्मीय बंधू-भगिनी उपस्थित होते.