सुरत,
Patient beaten for refusing medicine गुजरातमधील सुरत शहरात एका व्यसनमुक्ती केंद्रात घडलेल्या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे. उपचारासाठी दाखल करण्यात आलेल्या एका रुग्णाचा केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या मारहाणीमुळे मृत्यू झाल्याचा आरोप समोर आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी चौघांना ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.मिळालेल्या माहितीनुसार, डुमास परिसरातील रेवा व्यसनमुक्ती आणि पुनर्वसन केंद्रात ही घटना घडली. धवल राठोड नावाच्या बत्तीस वर्षांच्या तरुणाला २८ फेब्रुवारी रोजी व्यसनमुक्ती उपचारासाठी या केंद्रात दाखल करण्यात आले होते.
उपचारादरम्यान त्याने औषध घेण्यास नकार दिल्याने केंद्रातील काही कर्मचाऱ्यांशी त्याचा वाद झाला. या वादानंतर कर्मचाऱ्यांनी त्याला काठ्यांनी मारहाण केल्याचा आरोप आहे. मारहाणीमुळे त्याची प्रकृती अचानक बिघडली. १ मार्चच्या रात्री त्याला रुग्णवाहिकेद्वारे सुरतमधील नवीन नागरी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तपासल्यानंतर त्याला मृत घोषित केले. रुग्णाच्या शरीरावर जखमांचे चिन्ह आढळल्यामुळे प्रकरण संशयास्पद वाटल्याने मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले.
शवविच्छेदन अहवालात डोके, कंबर आणि शरीराच्या इतर भागांवर झालेल्या गंभीर दुखापतींमुळे त्याचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर पोलिसांनी व्यसनमुक्ती केंद्रातील कर्मचारी तसेच तेथील इतर रुग्णांची चौकशी केली. तपासादरम्यान औषध घेण्यास नकार दिल्यानंतर आरोपींनी धवल राठोड याला मारहाण केल्याचे उघड झाले. या प्रकरणी पोलिसांनी जिग्नेश देसाई, रोहन संघानी, शैलेश वाघेला आणि दिलीप जोशी या चौघांना अटक केली आहे. अटक केलेल्यांमध्ये दोन समुपदेशक, एक परिचर आणि एक वाहनचालक यांचा समावेश असून त्यांच्यावर खूनासह इतर गंभीर गुन्ह्यांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.