मुळशी 'पॅटर्न’मधील पिट्या भाईला कुत्र्याचा चावा

06 Mar 2026 11:50:57
मुंबई,
Ramesh Pardeshi dog bite incident शहरात भटक्या कुत्र्यांचा वाढता वावर आणि त्यातून घडणाऱ्या हल्ल्यांच्या घटना पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेता रमेश परदेशी यांनाही नुकताच भटक्या कुत्र्याचा चावा लागल्याची घटना घडली आहे. त्यांनी स्वतः सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत याबाबत माहिती दिली असून शहरातील भटक्या कुत्र्यांच्या प्रश्नाकडे प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी केली आहे.
 

Ramesh Pardeshi dog bite incident 
मुळशी पॅटर्न या गाजलेल्या चित्रपटातील ‘पिट्या भाई’ या भूमिकेमुळे लोकप्रिय झालेल्या रमेश परदेशी यांनी काही फोटो शेअर करत हा अनुभव सांगितला. त्यांनी लिहिले की, टेकडीवर ससे, मोर, फिरायला येणारे तरुण, लहान मुले, वृद्ध नागरिक तसेच त्यांच्या सोबत येणारे पाळीव प्राणी किंवा वृक्षप्रेमी दिसायला हवेत; मात्र प्रत्यक्षात तिथे मोठ्या प्रमाणावर भटकी कुत्री दिसत असल्याचे त्यांनी नमूद केले.
 
 
पोस्टमध्ये त्यांनी सांगितले की, नेहमीप्रमाणे ते एआरएआय टेकडीवर धावण्यासाठी गेले होते. धावत असताना एका ठिकाणी चार ते पाच कुत्री खात असल्याचे दिसले. त्या ठिकाणाहून जाताना त्यापैकी एका कुत्र्याने त्यांच्या मांडीवर चावा घेतला. ते पुढे गेले असता तेथे एक प्राणीप्रेमी १० ते १२ कुत्र्यांना अन्न देत असल्याचे त्यांनी पाहिले. त्यावेळी त्यांनी त्या व्यक्तीला तेथे अन्न न देण्याची विनंती केली आणि मुख्य रस्त्यावर अन्न द्यावे, कारण अशा ठिकाणी लहान मुले आणि वृद्ध नागरिकांनाही धोका निर्माण होऊ शकतो, असे सांगितले.घरी आल्यानंतर आंघोळ करताना चावा अधिक दुखत असल्याचे लक्षात आल्याने त्यांनी दुसऱ्या दिवशी सरकारी दवाखान्यात उपचार घेतले. डॉक्टरांनी त्यांना ‘टाइप ३’ प्रकारातील जखम असल्याचे सांगत एकूण पाच इंजेक्शन घ्यावी लागतील, असे सांगितल्याचे त्यांनी पोस्टमध्ये नमूद केले आहे. त्यापैकी दोन इंजेक्शन घेतली असून उर्वरित इंजेक्शन सात दिवसांच्या अंतराने घ्यावी लागणार असल्याचे त्यांनी सांगितले.
या प्रसंगानंतर रमेश परदेशी यांनी शहरातील भटक्या कुत्र्यांच्या समस्येबाबत प्रशासनाने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली आहे. ते स्वतःही प्राणीप्रेमी असल्याचे सांगत त्यांनी लिहिले की, भटक्या कुत्र्यांसाठी योग्य राहण्याची आणि खाण्याची व्यवस्था केली गेली पाहिजे. त्याचबरोबर त्यांची नसबंदी करून त्यांना एका ठिकाणी ठेवण्याची व्यवस्था केल्यास नागरिकांची सुरक्षितता आणि प्राण्यांचेही संरक्षण होऊ शकते.सरकार, नगरसेवक, आमदार आणि महापौर यांनी या प्रश्नाची दखल घ्यावी, अशी विनंती त्यांनी केली आहे. माणूस आणि प्राणी दोघांचाही जीव तितकाच महत्त्वाचा असल्याचे नमूद करत या समस्येवर तोडगा काढण्याची गरज असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. पोस्टच्या शेवटी त्यांनी “परमेश्वर करो, आता रेबीज वगैरे होऊ नये,” अशी आशाही व्यक्त केली आहे.
Powered By Sangraha 9.0