नवी दिल्ली,
suryakumar-statement-on-indias-victory भारत आणि इंग्लंड यांच्यात वानखेडे स्टेडियम येथे रंगलेला उपांत्य सामना शेवटच्या षटकापर्यंत उत्कंठा वाढवणारा ठरला. अत्यंत चुरशीच्या या लढतीत भारतीय संघाने सात धावांनी विजय मिळवत अंतिम फेरीत स्थान निश्चित केले. सामना संपल्यानंतर भारतीय संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव याने केलेल्या वक्तव्याची सर्वत्र चर्चा सुरू झाली आहे.
सामन्यानंतर बोलताना सूर्यकुमार यादव म्हणाला की, आजचा सामना जिंकणे ही अविश्वसनीय गोष्ट होती. भारतीय खेळाडूंनी अत्यंत जिद्दीने आणि एकजुटीने खेळ केला. विशेषतः संजू सॅमसन याने गडी बाद झाल्यानंतरही आपली आक्रमक शैली कायम ठेवली. त्याच्या धाडसी फलंदाजीमुळे इंग्लंडच्या गोलंदाजांवर दबाव निर्माण झाला आणि संघाला सामन्यात वरचष्मा मिळवता आला. यावेळी सूर्यकुमार यादवने जसप्रीत बुमराह याचेही कौतुक केले. suryakumar-statement-on-indias-victory संघाला जेव्हा गरज भासते, तेव्हा बुमराह पुढे येऊन जबाबदारी स्वीकारतो आणि विजयाचा मार्ग मोकळा करून देतो. तो संघासाठी अतिशय महत्त्वाचा खेळाडू असल्याचे सूर्या म्हणाला.
मात्र या सामन्याच्या विजयाचे खरे श्रेय देताना सूर्यकुमार यादवने सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. त्याने भारतीय संघाचे क्षेत्ररक्षण प्रशिक्षक टी दिलीप यांचे विशेष कौतुक केले. अक्षर पटेलच्या उत्कृष्ट क्षेत्ररक्षणाबद्दल बोलताना त्याने सांगितले की, सराव सत्रांमध्ये टी दिलीप यांनी घेतलेली मेहनत आणि दिलेले प्रशिक्षण याचेच हे फळ आहे. suryakumar-statement-on-indias-victory याशिवाय सूर्यकुमार यादवने शिवम दुबे याच्या खेळीचाही उल्लेख केला. त्याने फलंदाजी करताना धावांचा वेग कमी होऊ दिला नाही. त्या टप्प्यावर संघाला धावांचा वेग वाढवण्याची गरज होती आणि दुबेने ती जबाबदारी उत्तम प्रकारे पार पाडली, असे सूर्या म्हणाला.
दरम्यान, अभिषेक शर्मा याच्या कामगिरीवर काहींनी नाराजी व्यक्त केली असली तरी कर्णधार सूर्यकुमार यादव त्याच्या पाठीशी ठामपणे उभा राहिला. आमच्या संघातील पहिल्या तीन फलंदाजांमध्ये कोणताही बदल होणार नाही, असे त्याने स्पष्ट केले. परिस्थितीनुसार खेळात बदल करण्यासाठी शिवम दुबेला पुढे पाठवण्यात आले होते, असेही त्याने सांगितले. यावेळी सूर्यकुमार यादवने वानखेडेवरील प्रेक्षकांचेही मनापासून कौतुक केले. प्रेक्षकांनी निर्माण केलेला उत्साह आणि वातावरण विलक्षण होते. सरावाच्या वेळीही मैदानाचा मोठा भाग प्रेक्षकांनी भरलेला होता. असा उत्साह आणि पाठिंबा अन्यत्र क्वचितच पाहायला मिळतो, असे म्हणत त्याने चाहत्यांचे आभार मानले.