सावित्रीबाई-जोतीरावांच्या आयुष्यातील नवा अध्याय

06 Mar 2026 11:04:57
मुंबई ,
Savitri Jyotirao Phule serial, मराठी दूरचित्रवाणी विश्वातील ‘मी सावित्रीबाई जोतीराव फुले’ या मालिकेला संपूर्ण महाराष्ट्रातून प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. चिमुकली सावित्री आणि जोतीराव यांच्या बालपणापासून सुरू झालेला प्रवास, त्यांचा विवाहसोहळा, फुलेवाड्यातील घडामोडी तसेच सावित्रीबाईंनी सासरच्या वातावरणात जुळवून घेण्यासाठी केलेले प्रयत्न या सर्व प्रसंगांनी प्रेक्षकांच्या मनात या मालिकेने विशेष स्थान निर्माण केले आहे. त्याचबरोबर जोतीरावांनी शिक्षणासाठी केलेली धडपड आणि समाजातील अडथळ्यांवर मात करण्याची त्यांची जिद्दही प्रेक्षकांना भावली आहे.
 

Savitri Jyotirao Phule serial, Mi Savitribai Jyotirao Phule Star Pravah, Abhishek Deshmukh Jyotirao Phule role, 
आता ही मालिका एका महत्त्वपूर्ण टप्प्यावर पोहोचली असून कथानकात मोठा बदल पाहायला मिळणार आहे. पुढील भागांमध्ये प्रेक्षकांना सावित्रीबाई आणि जोतीराव यांच्या तारुण्यावस्थेतील नवा अध्याय पाहायला मिळणार आहे. समाजातील रूढी-परंपरांच्या चौकटीत अडकलेल्या काळात सावित्रीबाईंनी शिक्षण घ्यावे आणि स्वावलंबी व्हावे यासाठी जोतीरावांनी केलेले प्रयत्न या नव्या पर्वात उलगडणार आहेत. सावित्रीबाईंना शिक्षणाची दारे खुली करून देण्यासाठी जोतीरावांनी दाखवलेली दूरदृष्टी आणि समाजपरिवर्तनासाठी दाखवलेले धैर्य यामुळे मालिकेची कथा अधिक प्रेरणादायी बनणार आहे.
या नव्या टप्प्यात सुप्रसिद्ध अभिनेता अभिषेक देशमुख जोतीराव फुले यांच्या भूमिकेत दिसणार आहेत, तर अभिनेत्री राजसी भावे सावित्रीबाई फुले यांची भूमिका साकारणार आहेत. त्यांच्या प्रभावी अभिनयातून समाजपरिवर्तनाची ही प्रेरणादायी कथा अधिक ताकदीने प्रेक्षकांसमोर येणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
या भूमिकेबद्दल Savitri Jyotirao Phule serial, बोलताना राजसी भावे म्हणाल्या की, त्यांच्या आयुष्यातील ही पहिलीच मालिका असून तीही स्टार प्रवाहसोबत करण्याची संधी मिळाल्याने त्या आनंदित आहेत. सावित्रीबाईंसारखे महान व्यक्तिमत्त्व साकारण्याची संधी मिळणे ही त्यांच्यासाठी अत्यंत खास बाब असल्याचे त्यांनी सांगितले. बालपणीची सावित्रीबाई साकारणाऱ्या तक्षा शेट्टीने ही भूमिका अतिशय सुंदररीत्या उभी केली असून तिच्याकडून अनेक गोष्टी समजून घेण्याचा प्रयत्न करत असल्याचेही त्यांनी नमूद केले. ही भूमिका त्यांच्या मनाच्या खूप जवळची असल्याचेही त्यांनी सांगितले.तर अभिषेक देशमुख यांनीही या भूमिकेबद्दल आनंद व्यक्त केला. इतके महान व्यक्तिमत्त्व साकारण्याची संधी मिळणे हा आपल्या आयुष्यातील अभिमानाचा क्षण असल्याचे त्यांनी सांगितले. या मालिकेचा पहिल्या भागापासून आपण चाहता असल्याचेही त्यांनी नमूद केले. मालिकेची कथा इतकी अभ्यासपूर्ण आणि अर्थपूर्ण असल्यामुळे जोतीरावांच्या भूमिकेसाठी वेगळा अभ्यास करण्याची गरज भासली नाही, असेही ते म्हणाले. ‘आई कुठे काय करते’ या मालिकेनंतर पुन्हा एकदा स्टार प्रवाह परिवाराचा भाग होण्याची संधी मिळाल्याने आनंद झाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.सावित्रीबाई आणि जोतीराव फुले यांची ही कथा केवळ एका दांपत्याची कहाणी नसून समाजपरिवर्तनाची प्रेरणादायी सुरुवात आहे. शिक्षण, समानता आणि सामाजिक न्याय यांसाठी केलेल्या त्यांच्या संघर्षाची ही गाथा नव्या पर्वात अधिक प्रभावीपणे उलगडताना पाहायला मिळणार आहे. त्यामुळे ‘मी सावित्रीबाई जोतीराव फुले’ मालिकेतील हा नवा अध्याय प्रेक्षकांसाठी विशेष ठरणार आहे.
Powered By Sangraha 9.0