सेलू,
appointment-of-trustees : विदर्भाची प्रती पंढरी म्हणून ओळखल्या जाणार्या तीर्थक्षेत्र घोराड येथील विठ्ठल-रुख्माई देवस्थानच्या कमिटीतील चार विश्वस्तांची जागा रित असलेल्या पदावर नव्याने चार विश्वस्ताची निवड करण्यात आली आहे.

विठ्ठल-रुख्माई देवस्थानमध्ये सात सदस्यीय कार्यकारिणी आहे. त्यापैकी बर्याच वर्षांपासून यातील चार विश्वस्तांचा मृत्यू झाला. त्यामुळे ही पदे रित होती. या पदावर नवे सदस्य घेण्यासाठी अध्यक्षांनी सदस्यांची आमसभा ११ नोव्हेंबर २०२३ रोजी भत निवासमध्ये बोलावण्यात आली असता या आमसभेत काहींनी गोंधळ घातला. त्यामुळे तत्कालीन अध्यक्षांनी ही सभा तहकूब केली होती. तहकूब झालेली सभा झाली नाही मात्र, अध्यक्ष रामराव कावळे यांनी अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर नानाजी खराबे यांनी अध्यक्षपद भूषविले. पण, तीन जणच कमिटीत असल्यामुळे नवीन चार सदस्य घेण्यासाठी १० जुलै २०२५ रोजी देवस्थानचे सचिव सुरेश धंदरे यांनी धर्मादाय आयुत यांच्याकडे या रित जागेवर विश्वस्त घेण्यासाठी चेंज रिपोर्ट सादर केला. त्या चेंज रिपोर्टला तात्पुरत्या स्वरूपात मंजुरी देण्यात आली आहे. मात्र, धर्मदाय आयुतांकडे काही नागरिकांनी अर्ज केले त्यावर निर्णय येण्याची प्रतीक्षा कायम आहे.
केजुबाबा नामदेव भांदककर, बबन दौलतराव माहुरे, रवींद्र हरिभाऊ तेलरांधे, पांडुरंग विठोबा गोमासे या चार विश्वस्तांच्या मृत्यूमुळे अनेक वर्षांपासून जागा रित झाली होती. यांच्या रित जागेवर गोपाळ माहुरे, पळसराम गोमासे, रामेश्वर घंगारे, प्रशांत मुजबैले यांच्या नावाला ९ जानेवारी २०२६ रोजी तात्पुरत्या स्वरूपाची मंजुरी मिळाली असून याबाबतची जाहिरात एका वृत्तपत्रात प्रकाशित करण्यात आली आहे. यावर ३० दिवसांच्या आत हरकत घेण्याची मुदत देण्यात आली होती. त्यामुळे या चार जणांचा समावेश झाल्याने आता सात जण देवस्थानचा कारभार पाहणार आहे.
गावातील नागरिकांनी आमचा समावेश विश्वस्त म्हणून करावा यासाठी काहींनी धर्मादाय आयुतांकडे अर्ज केला आहे. या अर्जावर विचार झाल्यास पुढे काय होणार, याकडे आता लक्ष लागले असून या विश्वस्तांच्या नावात काही बदल होणार काय, हे महत्वाचे ठरणार आहे. सध्यातरी नवे सदस्य आता मंदिराचा विकास व उत्पन्न वाढीसाठी कोणते निर्णय घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या देवस्थानने गत काहीवर्षांपूर्वी सदस्य नोंदणी केली होती, हे विशेष.