अर्जुनी मोर(गोंदिया),
Vilas Sonwane drowning तालुक्यातील कोहलगाव येथील 23 वर्षीय तरुण विलास शंकर सोनवाने याचा गाय वाचवण्याच्या प्रयत्नात तलावात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. विशेष म्हणजे ही घटना त्याच्या वाढदिवशीच घडल्याने संपूर्ण गावात हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, विलास सोनवाने हा आज दुपारी 12 वाजताच्या सुमारास नेहमीप्रमाणे घरच्या गाय-म्हशी चरायला घेऊन गेला होता. गावालगत असलेल्या मामा तलावावर जनावरांना पाणी पाजत असताना कळपातील गाईंपैकी एक गाय पाण्यात अधिक आत गेली. तिला बाहेर काढण्यासाठी विलास तलावात उतरला. मात्र तलावातील पाण्याचा खोलीचा अंदाज न आल्याने तो अचानक खोल पाण्यात गेला आणि दुर्दैवाने बुडाला. घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत शोधकार्य सुरू केले. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच नवेगाव बांध पोलिस ठाण्याचे ठाणेदार अजित पाटील घटनास्थळी दाखल झाले असून पोलिस व स्थानिक नागरिकांच्या मदतीने तलावात शोधमोहीम राबविण्यात येत आहे. आजच विलास सोनवाने याचा वाढदिवस असल्याने या दुर्दैवी घटनेने कोहलगाव परिसरात शोककळा पसरली आहे. कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. वृत्त लिहिपर्यंत विलासचे प्रेत शोधण्याचे कार्य सुरू होेते.