आदिवासी आश्रम शाळेतील 11 वर्षीय विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू

07 Mar 2026 20:07:05
अर्जुनी मोर,
11-year-old student, tribal residential school, तालुक्यातील येरंडी येथील आदिवासी आश्रम शाळेत इयत्ता पाचवीत शिक्षण घेत असलेली 11 वर्षीय विद्यार्थिनी नुतन निताराम मडावी हिचा अल्पशा आजाराने दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
 
 

11-year-old student, tribal residential school,
मिळालेल्या माहितीनुसार, होळीच्या सुट्टीनिमित्त शाळा व्यवस्थापनाने 26 फेब्रुवारी रोजी नुतन हिला तिच्या लहान बहिणीसह मूळ गाव परसटोला येथे सुखरूप पोहोचविले होते. त्यानंतर दोन दिवसांनी ती आपल्या मामाच्या गावात जुनेवाणी येथे गेल्याची माहिती आहे. मात्र तेथे अचानक तिची प्रकृती बिघडली. कुटुंबीयांनी तिला प्रथम कुरखेडा येथील रुग्णालयात नेले व नंतर पुढील उपचारासाठी गडचिरोली येथे हलविले. मात्र उपचारादरम्यान 3 मार्च रोजी तिचा मृत्यू झाला. या घटनेनंतर विद्यार्थिनीला शाळेत असताना काही प्रकृतीसंबंधी तक्रार होती का, तिला वेळेवर वैद्यकीय उपचार मिळाले होते का तसेच या संपूर्ण प्रकरणात प्रशासनाची भूमिका काय होती, याबाबत चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान, येरंडी येथील आश्रम शाळेच्या मुख्याध्यापिका नूतन अनिल दहिवले यांनी सांगितले की, विद्यार्थिनीला होळीच्या सणानिमित्त 26 फेब्रुवारी रोजी तिच्या गावी सुखरूप सोडण्यात आले होते. शाळेच्या नोंदी तपासल्या असता ती शाळेत असताना आजारी असल्याची कोणतीही नोंद नाही. ती पूर्णपणे ठणठणीत असल्यानेच तिला गावी पाठविण्यात आले होते. तिच्या मृत्यूची माहिती मिळताच आपण स्वतः कुटुंबीयांना भेटून सांत्वन केले असून शाळेच्या वतीने शक्य ती मदत करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच शाळेत विद्यार्थ्यांची नियमित आरोग्य तपासणी केली जात असल्याचा दावा त्यांनी केला. नुतनच्या अकाली निधनामुळे गावासह परिसरात हळहळ व्यक्त होत असून या घटनेची सत्य परिस्थिती समोर यावी व आवश्यक ती कारवाई व्हावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.
Powered By Sangraha 9.0