शासन-प्रशासनाला जागृत करण्यासाठी ‘सद्बुद्धी महायज्ञ’

07 Mar 2026 19:41:04
चंद्रपूर,
Chandrapur wildlife protest, जिल्ह्यातील वाढता मानव-वन्यजीव संघर्ष, वाघांच्या हल्ल्यात होणारे मृत्यू आणि ताडोबाच्या महत्त्वपूर्ण वन्यजीव कॉरिडोरला धोका निर्माण करणार्‍या ‘लोहारडोंगरी’ खाण प्रकल्पाविरोधात इको-प्रो संस्थेचे अध्यक्ष बंडू धोतरे यांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेल्या अन्नत्याग सत्याग्रहाला शनिवार, 7 मार्चला तीन दिवस झाले. या आंदोलनाच्या माध्यमातून शासन आणि प्रशासनाला वन्यजीव रक्षणाप्रती जागृत करण्यासाठी आंदोलनस्थळी ‘सद्बुद्धी महायज्ञ’ करण्यात आला.

Chandrapur wildlife protest,
लोहारडोंगरी खाण प्रकल्प रद्द करा, या मुख्य मागणीसह 16 मागण्यांचे निवेदन बंडू धोतरे यांनी प्रशासनाला दिले आहे. यामध्ये ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या कॉरिडोर क्षेत्रात प्रस्तावित असलेल्या लोहारडोंगरी लोह खाण प्रकल्पाची वन्यजीव विषयक परवानगी त्वरित रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे. जर ही खाण सुरू झाली, तर वन्यजीवांचा मार्ग खुंटून मानव-वन्यजीव संघर्ष अधिक भीषण होईल, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. आंदोलनात व्याघ्र भ्रमंती मार्ग सुरक्षित करून वन्यजीवांच्या अधिवासात होणारा मानवी हस्तक्षेप थांबवणे, जिल्ह्यात वाघांच्या हल्ल्यात होणारे मृत्यू रोखण्यासाठी ठोस आणि कायमस्वरूपी उपाययोजना करणे, वन्यजीव संरक्षण आणि स्थानिकांच्या सुरक्षेबाबतच्या प्रलंबित मागण्यांवर तात्काळ अंमलबजावणी करणे आदी मागण्यांचा समावेश आहे. आंदोलनाच्या तिसर्‍या दिवशीही प्रशासनाकडून ठोस पावले उचलली न गेल्याने आंदोलकांनी अनोख्या पद्धतीने निषेध नोंदविला. प्रशासनाला आणि सरकारला या गंभीर प्रश्नावर निर्णय घेण्याची सद्बुद्धी मिळावी, या उद्देशाने महायज्ञ करण्यात आला. शनिवारी मंडपास वन्यजीव प्रेमी आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून बंडू धोतरे यांच्या लढ्याला पाठिंबा दर्शविला.
लोहारडोंगरी खाण प्रकल्प हा केवळ पर्यावरणाचा प्रश्न नसून, तो चंद्रपूरकरांच्या सुरक्षिततेचा प्रश्न आहे. जोपर्यंत या विनाशकारी प्रकल्पाची परवानगी रद्द होत नाही आणि मानव-वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठी ठोस पावले उचलली जात नाहीत, तोपर्यंत हा अन्नत्याग सत्याग्रह सुरूच राहील, असा इशारा बंडू धोतरे यांनी दिला.
Powered By Sangraha 9.0