अहमदाबाद,
Changes in the Indian team before match रविवारी अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियम येथे वीस षटकांच्या विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना रंगणार असून भारत आणि न्यूझीलंड यांच्यात विजेतेपदासाठी जोरदार लढत होणार आहे. या सामन्याकडे संपूर्ण क्रिकेटविश्वाचे लक्ष लागले आहे. विशेष म्हणजे या स्पर्धेतील सामन्यांमध्ये भारताला न्यूझीलंडवर अद्याप विजय मिळवता आलेला नाही. दोन्ही संघांमध्ये झालेल्या तीनही सामन्यांत न्यूझीलंडनेच बाजी मारली आहे. त्यामुळे यंदाचा अंतिम सामना भारतासाठी प्रतिष्ठेचा ठरणार आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यात आतापर्यंत वीस षटकांच्या प्रकारात एकूण तीस सामने खेळले गेले आहेत. त्यापैकी भारताने सोळा सामने जिंकले तर न्यूझीलंडने अकरा सामने जिंकले आहेत. तीन सामने अनिर्णित राहिले असून त्यातील दोन सामने भारताने अतिरिक्त षटकांत जिंकले आहेत.

अंतिम फेरी गाठण्यासाठी भारताने उपांत्य सामन्यात इंग्लंडवर सात धावांनी मात केली. या सामन्यात भारतीय फलंदाजांनी दमदार खेळी करत सात गडी गमावून २५३ धावांचा मोठा डोंगर उभारला होता. लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडनेही जोरदार प्रयत्न केले, मात्र सात गडी गमावून २४६ धावांपर्यंतच त्यांची मजल गेली. या सामन्यात संजू सॅमसनने शानदार फलंदाजी करत ४२ चेंडूंमध्ये ८९ धावा केल्या आणि संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. दरम्यान, अंतिम सामन्यात संघरचनेत बदल होणार का याबाबत चर्चा रंगली आहे. फिरकी गोलंदाज वरुण चक्रवर्तीची न्यूझीलंडविरुद्धची कामगिरी विशेष प्रभावी राहिलेली नाही. त्याने न्यूझीलंडविरुद्ध खेळलेल्या चार सामन्यांत केवळ चार बळी घेतले असून त्याची धावगतीही जास्त राहिली आहे. त्यामुळे त्याच्या जागी कुलदीप यादवला संधी मिळू शकते, अशी शक्यता व्यक्त होत आहे. नरेंद्र मोदी मैदानावर मात्र कुलदीपची कामगिरी चांगली राहिली आहे. येथे खेळलेल्या तीन सामन्यांत त्याने आठ बळी घेतले आहेत.
दुसरीकडे, सलामीचा फलंदाज अभिषेक शर्माची कामगिरीही या स्पर्धेत अपेक्षेप्रमाणे झालेली नाही. जागतिक क्रमवारीत अग्रस्थानी असलेल्या या फलंदाजाची फलंदाजी यंदाच्या स्पर्धेत फारशी चमकली नाही. उपांत्य सामन्यात तो अवघ्या नऊ धावांवर बाद झाला होता. या स्पर्धेत त्याने सात डावांत केवळ ८९ धावा केल्या आहेत. त्यामुळे अंतिम सामन्यात त्याला संधी मिळणार की नाही याबाबतही चर्चा सुरू आहे. संघाचा मधल्या फळीतील खेळ अधिक मजबूत करण्यासाठी रिंकू सिंगला संधी द्यावी, असा सल्लाही काही माजी खेळाडूंनी दिला आहे. तसेच संजू सॅमसनसोबत सलामीला इशान किशनला पाठवण्याचा पर्यायही चर्चेत आहे. मात्र दोन्ही संघांनी उपांत्य सामन्यात ज्या संघरचनेने खेळ केला त्यात फारसा बदल होणार नाही, अशी शक्यता वर्तवली जात आहे.दरम्यान, अंतिम सामन्यात कोणता संघ विजेतेपद पटकावतो याकडे सर्व क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागले असून अहमदाबादमध्ये होणाऱ्या या सामन्याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.