गडचिरोली,
Gadchiroli ring road demand, गडचिरोली शहरात वाढत चाललेल्या वाहतूक कोंडी व वारंवार घडणार्या अपघातांच्या पृष्ठभूमीवर शहराला पर्यायी मार्ग उपलब्ध करून देण्यासाठी रिंगरोड उभारणे अत्यंत आवश्यक आहे. या मागणीला घेऊन नगराध्यक्षा अॅड. प्रणोती सागर निंबोरकर यांनी नुकतेच जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांची भेट घेत सकारात्मक चर्चा करमन निवेदन सादर केले.
गेल्या काही वर्षांपासून गडचिरोली शहरातून जाणार्या मुख्य मार्गांवर वाहनांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ वाढली आहे. शहरातूनच मोठ्या मालवाहू ट्रक व इतर जड वाहने जात असल्याने वाहतूक कोंडी निर्माण होते. याशिवाय दिवसागणिक अपघातांच्या मालिकेतही वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. विशेषतः शाळा-कॉलेज परिसर, बाजारपेठ आणि प्रमुख चौकांमध्ये वाहतुकीचा ताण अधिक जाणवत आहे. या वाढत्या अपघातांमध्ये कित्येक निष्पाप नागरिकांनी आपला जीव गमावला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शहरातील वाहतूक सुरक्षित करण्यासाठी तातडीने प्रभावी उपाययोजना करणे अत्यंत आवश्यक असल्याचेही यावेळी अॅड. निंबोरकर म्हणाल्या.
शहराच्या बाहेरील भागातून रिंगरोड उभारल्यास जड वाहतूक शहराबाहेरून वळवता येईल, ज्यामुळे शहरातील वाहतूक सुरळीत होऊन अपघातांचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल. शहराच्या वाढत्या लोकसंख्येला आणि भविष्यातील वाहतुकीच्या गरजांना लक्षात घेता रिंगरोड प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा ठरणार असल्याचे त्यांनी निवेदनात नमूद केले आहे.
यावेळी जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी या मागणीची दखल घेत संबंधित विभागांशी समन्वय साधून प्रस्तावाबाबत सकारात्मक पावले उचलण्याचे आश्वासन दिले. शहराच्या सुरक्षित व नियोजित विकासासाठी रिंगरोड प्रकल्प महत्त्वाचा ठरू शकतो, असेही त्यांनी सांगितले.
गडचिरोली शहरातील वाढत्या अपघातांना आळा घालण्यासाठी व नागरिकांचे जीवित सुरक्षित ठेवण्यासाठी रिंगरोड प्रकल्प लवकरात लवकर मार्गी लावावा, अशी तातडीची मागणी आता जोर धरू लागली आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रशासनाने यावर तातडीने ठोस निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.