भारतात गॅस टंचाईची शक्यता!...पुरवठा बंद

07 Mar 2026 10:07:59
नवी दिल्ली,
gas shortage in India मध्यपूर्वेत सुरू असलेल्या तणावाचे परिणाम आता भारतातही जाणवू लागले आहेत. इराण आणि इस्रायल यांच्यातील संघर्षामुळे ऊर्जा पुरवठ्यावर परिणाम होण्याची भीती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांना घरगुती गॅसची कमतरता भासू नये म्हणून केंद्र सरकारने व्यावसायिक वापरासाठी दिल्या जाणाऱ्या गॅस सिलेंडरच्या पुरवठ्यावर तात्पुरती मर्यादा घालण्याचा निर्णय घेतल्याची माहिती पुढे आली आहे. या निर्णयामुळे देशभरातील भोजनालय, खानावळी आणि खाद्य व्यवसायाशी संबंधित उद्योगांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
 
 
gas shortage in India
 
इराणने होर्मुझ सामुद्रधुनीत केलेल्या नाकेबंदीमुळे मध्यपूर्वेकडून येणाऱ्या गॅस टँकरच्या हालचालींवर मोठा परिणाम झाला आहे. भारतातील गॅसचा मोठा हिस्सा परदेशातून येत असल्यामुळे या परिस्थितीचा थेट परिणाम देशातील पुरवठा व्यवस्थेवर होत आहे. त्यामुळे घरगुती वापरासाठी गॅसचा साठा सुरक्षित ठेवण्याच्या उद्देशाने व्यावसायिक गॅसचा पुरवठा थांबवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले जात आहे. या निर्णयामुळे सर्वाधिक फटका भोजनालय आणि खानावळ व्यवसायाला बसत असल्याचे दिसून येत आहे. नागपूर येथील निवासी हॉटेल संघटनेने केंद्र सरकारला या निर्णयाचा पुनर्विचार करण्याचे आवाहन केले आहे. युद्धासारख्या कठीण परिस्थितीत आम्ही सरकारसोबत आहोत; मात्र व्यावसायिक गॅसवर निर्बंध लावताना ते टप्प्याटप्प्याने लागू करावेत, अशी मागणी संघटनेने केली आहे.
 
संघटनेचे कार्यकारिणी सदस्य सुदर्शन वझलवार यांनी सांगितले की, व्यावसायिक गॅसचा पुरवठा पूर्णपणे बंद राहिला तर चार ते पाच दिवसांत अनेक हॉटेल व्यवसाय बंद करण्याची वेळ येऊ शकते. हजारो लहान-मोठे व्यावसायिक या गॅसवर अवलंबून असल्यामुळे त्यांच्या समोर मोठे आर्थिक संकट उभे राहण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली.
Powered By Sangraha 9.0