अनिल कांबळे
नागपूर,
boiling water on grandson अंगावर रंग टाकणाऱ्या नातवाच्या अंगावर चुलत आजीने उकळते पाणी फेकले. यात गंभीररित्या भाजलेला चिमुकला सध्या रुग्णालयात उपचार घेत आहे. पोलिसांनी आरोपी महिलेविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
मेघा (वय ३२, खापरखेडा, ता. सावनेर) यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. जखमी मुलगा ओम (साडेतीन वर्ष) हा काही दिवसांपासून आपल्या मामाकडे कोराडी येथील न्यू कोराडी वॉर्ड क्रमांक २ परिसरात रहायला आला होता. निरागसपणे खेळणाऱ्या ओमला काय घडणार आहे याची कल्पनाही नव्हती. ३ मार्च रोजी सकाळी सुमारे ९.२० वाजता घरासमोर खेळताना ओमने पिचकारीतून रंग उडवला. तो रंग त्याची चुलत आजी सिंधुबाई लीलाराम ठाकरे (६०) हिच्या अंगावर पडला. या किरकोळ कारणाने संतापलेल्या सिंधुबाईने जवळ असलेल्या बादलीतील गरम पाणी ओमच्या अंगावर फेकले. यामुळे ओम कळवळला व उकळत्या पाण्यामुळे ओमच्या कंबरेपासून गुडघ्यापर्यंत तसेच डावा हात भाजला गेल्या. ओमला कोराडीतील हॉस्पिटलमध्ये दाखल केले गेले. मात्र प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी त्याला नागपूरमधील नेल्सन हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले आहे.boiling water on grandson त्याच्या आईला कुटुंबीयांनी फोन करून माहिती दिली. त्यांच्या तक्रारीवरून सिंधुबाईविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. होळीच्या सणात रंगांच्या खेळातून आनंद पसरायला हवा असताना एका निष्पाप चिमुकल्यावर असा अमानुष प्रसंग ओढवला असल्याने परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे.