वर्धा,
womens day ग्रामीण भागातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करून स्वावलंबी बनविण्यासाठी वर्धेच्या तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी लिना बनसोड यांनी देशातील पहिला वर्धिनी नावाने एक चळवळ उभी केली. ती संपुर्ण राज्यात राबवण्यात आली. वर्धेतून वर्धिनीच्या माध्यमातून सुरू झालेली महिला बचत गटाची चळवळ पुढे अधिक बळकट होत गेली. वर्धा सोडून राज्य सरकारच्या अन्य पदांची जबाबदारी सांभाळत असतानाही वर्धेतील अनेक महिला बचत गट बनसोड यांच्या कार्यशैलीला विसरल्या नाहीत. महिला बचत गटाचा शुन्यापासुन सुरू झालेला प्रवास १३ हजार ९३७ महिला बचतगटांपर्यंत पोहोचला. या बचतगटांच्या माध्यमातून हजारो महिलांनी स्वतःचा रोजगार निर्माण करत आपल्या कुटुंबाच्या आर्थिक उन्नती साधली.
महिला बचतगटांना प्रोत्साहन देण्यासाठी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा आणि विविध बँकांच्या माध्यमातून कर्ज उपलब्ध करून दिले जात आहे. आतापर्यंत ८ हजार ८०० महिला बचतगटांना ३७२ कोटी रुपयांचे लघुउद्योग सुरू केले असून अनेक गटांनी आर्थिकदृष्ट्या स्थैर्य मिळविले आहे. पूर्वी केवळ घरकामापुरत्या मर्यादित असलेल्या ग्रामीण भागातील महिला आता बचतगटांच्या माध्यमातून स्वतःचे व्यवसाय उभारून स्वाभिमानाने जीवन जगत आहेत. महिला बचतगटांनी शिवणकाम, भरतकाम, हस्तकला, अगरबती निर्मिती, लोणचे तयार करणे, तसेच शेतीपूरक व्यवसाय अशा विविध क्षेत्रात आपले स्थापन निर्माण केले आहे. या व्यवसायातून महिलांना नियमित उत्पन्न मिळत असल्याने त्यांच्या कुटुंबाची आर्थिेक परिस्थिती सुधारली आहे. अनेक महिलांनी आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी, घरबांधणीसाठी आणि इतर गरजांसाठी या उत्पन्नाचा उपयोग केला आहे. त्यामुळे महिला बचतगट हे केवळ बचतीचेे साधन न राहता आर्थिक आणि सामाजिक परिवर्तनाचे प्रभावी माध्यम ठरत आहेत. महिला बचतगटांमुळे महिलांमध्ये बचतीची सवय लागली असून आर्थिक व्यवहाराचे ज्ञान, नियोजन क्षमता आणि आत्मविश्वास वाढला आहे. याशिवाय महिलांचा सामाजिक सहभाग वाढला असून त्या गावाच्या विकास कामांमध्येही सक्रिय भूमिका बजावत आहेत.
जिल्हा प्रशासनाकडून भविष्यात अधिकाधिक महिलांना बचतगटांमध्ये सहभागी करून घेण्याचा आणि त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न सुरू आहे. महिला बचतगटांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील महिलांच्या जीवनमानात सुधारणा होत असून ग्रामीण अर्थव्यवस्थेला मजबूत आधार मिळत आहे. महिला बचतगटा चहवळ ही ग्रामीण भागातील महिलांसाठी आशेचा किरण ठरत असून महिला सक्षमीकरण आणि ग्रामीण विकासाचा प्रभावी पाया म्हणून ही चळवळ अधिक बळकट होत आहे.
जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या माध्यमातून महिला बचतगटांना केवळ कर्जच नव्हे तर प्रशिक्षण, मार्गदर्शन आणि विविध शासकीय योजनांची माहिती देखील दिली जाते. यामुळे महिलांना उद्योग सुरू करणे आणि तो यशस्वीपणे चालविणे सोपे होत आहे. अनेक बचतगटांनी आपल्या उत्पादनांना बाजारपेठ मिळवून दिली असून काही गटांनी जिल्हास्तरावर आपली ओळख निर्माण केली आहे. महिला बचतगटांच्या या यशस्वी वाटचालीमुळे जिल्ह्यात महिला सक्षीमरणाला नवी दिशा मिळाली आहे.
आर्थिकसोबत आता क्षमता वृद्धिंगत करावी : बनसोड
महिला बचत गट हे स्वयंसहाय्यता गट आहे. बचत गटाच्या माध्यमातून महिलांची आर्थिक उन्नती हा एक भाग असला तरी महिलांनी मैत्रिणींसारखं एकत्र यावं. एकमेकींची क्षमता ओळखावी. एकमेकींच्या सुखदु:खात सहभागी व्हावे हा एक उद्देेश आहे, अशी प्रतिक्रिया जागतिक महिला दिनाच्या पुर्वसंध्येला वर्धेतील वर्धिणी या ब्रॅण्डची संकल्पना मांडणार्या नाशिक येथे आदिवासी विकास मंडळाच्या आयुत लिना बनसोड यांनी तरुण भारत सोबत बोलताना सांगितले. महिलांमध्ये आता क्षमता निर्माण झाली आहे. त्या एकमेकींसोबत जुळल्या आहे.womens day त्यामुळे एखादीला तिचा पती दारू पिऊन वगैरे त्रास देत असेल तर त्याला जाब विचारता यावा अशी हिम्मत निर्माण झाली पाहिजे. महिलांनी एकत्र येऊन स्वत:सोबत गटातील महिलांचाही आर्थिक, सामाजिक विकास होईल, याकडे लक्ष दिले पाहिजे, असे आयुत लिना बनसोड म्हणाल्या.