वारणावती
Sahyadri Tiger Reserve water shortage, मार्च महिन्याच्या सुरुवातीसून सह्याद्री व्याघ्र प्रकल्प परिसरात उन्हाची तीव्रता वाढल्यामुळे पाणीटंचाईचे संकट गडद झाले आहे. जंगलातील नैसर्गिक तसेच कृत्रिम पाणवठे तळ गाठल्यामुळे वन्यप्राण्यांपुढे तहानेचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. परिणामी, काही प्राणी पाण्याच्या शोधात आपला अधिवास सोडून मानवी वस्तीकडे वळत आहेत, ज्यामुळे प्रकल्प परिसरातील गावांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
व्याघ्र प्रकल्पात पर्यटन आणि पायाभूत सुविधा वाढवण्यासाठी दरवर्षी मोठ्या प्रमाणावर निधी खर्च केला जातो. मात्र, सध्या आर्थिक वर्ष संपत आल्यामुळे अनेक ठिकाणी नवीन कामे पूर्ण करणे आणि त्यांची बिले निकाली काढणे या प्रक्रियेत प्रशासनाचा भर आहे. याच गडबडीत वन्यप्राण्यांच्या पाण्याकडे अपेक्षित लक्ष दिले गेले नसल्याची टीका स्थानिकांकडून होत आहे.गाभा क्षेत्रातील अनेक नैसर्गिक पाणवठे आटले असून, या काळात कृत्रिम पाणवठेच वन्यप्राण्यांचा मुख्य आधार ठरतात. मात्र, अनेक ठिकाणी हे पाणवठे कोरडे पडल्यामुळे बिबट्या, गवा, भेकर, सांबर यांसारखे प्राणी भटकताना दिसत आहेत. त्यामुळे पाळीव जनावरांवर हल्ल्यांचा धोका वाढू शकतो. तसेच जंगलाबाहेर पडणाऱ्या प्राण्यांवर शिकारी टपून बसण्याची शक्यता वाढते, तर कडक उन्हाळा आणि पाण्याचा अभाव वन्यजीवांच्या आरोग्यावरही परिणाम करतो.
वन विभागाने तातडीने Sahyadri Tiger Reserve water shortage, टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करून पाणवठे भरले नाहीत, तर जंगलाबाहेर स्थलांतर वाढण्याची भीती आहे. शिराळा पंचायत समितीच्या सदस्या मनिषा पाटील यांनी सांगितले, “नवीन सिमेंटच्या कामांपेक्षा सध्या कोरडे पडलेले पाणवठे भरणे अधिक महत्त्वाचे आहे. तहानलेले प्राणी गावांकडे येणारच, योग्य नियोजन न झाल्यास मानव-वन्यजीव संघर्ष वाढू शकतो.वनक्षेत्रपाल ऋषिकेश पाटील यांनी स्पष्ट केले की, सह्याद्री प्रकल्पातील सर्व कृत्रिम पाणवठे लवकरच भरले जाणार असून, त्यासाठी आवश्यक नियोजन सध्या सुरू आहे. स्थानिकांना आशा आहे की प्रशासन लवकर कार्यवाही करून पाण्याच्या संकटातून वन्यजीवांना संरक्षण देईल.