चिखलदरा महोत्सवाची व्यापकता वाढवा

08 Mar 2026 11:32:30
अमरावती,
Chikhaldara Mahotsav Amravati, विभागीय मिनी सरस वैदर्भीय महोत्सवाप्रमाणे चिखलदरा महोत्सवात व्यापकता निर्माण करण्यासाठी महिला बचतगट प्रदर्शन, विक्री केंद्र स्थापन करावे. महिला सक्षमीकरण आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देणार्‍या वैदर्भी महोत्सवाचे यश हाच खरा महिला दिन आहे. या स्तुत्य उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.
 

 Chikhaldara Mahotsav Amravati, 
जिल्हा प्रशासन आणि ’उमेद’ महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या वतीने सायन्सस्कोर मैदान येथे ८ मार्चपर्यंत ’महिला दिन महोत्सव’ आणि ’विभागीय मिनी सरस व वैदर्भी महोत्सव २०२६’ चे आयोजन शनिवारी करण्यात आले आहे. त्यावेळी उद्घाटन करताना ते बोलत होते.
यावेळी खासदार डॉ. अनिल बोंडे, आमदार संजय खोडके, सुलभा खोडके, रवि राणा, प्रवीण तायडे, राजेश वानखडे, गजानन लवटे, महापौर श्रीचंद तेजवानी, विभागीय आयुक्त डॉ. श्वेता सिंघल, जिल्हाधिकारी आशिष येरेकर , मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महापात्र, प्रकल्प संचालक प्रिती देशमुख, माविम संचालक रंजन वानखडे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
पालकमंत्री बावनकुळे म्हणाले की, महिला बचतगटांनी तयार केलेले वस्तूचे प्रदर्शन व विक्रीमुळे निर्माण होणार्‍या आर्थिक स्थैर्यतेमुळे महिलांच्या जीवनात आमुलाग्र बदल निर्माण होत आहे. ही बाब लाडक्या बहिणींच्या सक्षमतेसाठी महत्वपूर्ण आहे. महिलांना रोजगार निर्मितीसाठी फिरते भांडवल उपलब्ध करून दिले जाईल. अमरावतीत महिला बचतगटात २ लाख २० हजार महिला सहभागी आहेत. महिला सक्षमीकरण आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देणार्‍या वैदर्भी महोत्सवाचे यश हाच खरा महिला दिन असल्याचे ते यावेळी म्हणाले. राज्यशासन २०२६ मध्ये आरोग्यविषयक यंत्रणा अधिक विकसित करण्यावर भर देत आहे. या पृष्ठभूमीवर अमरावतीमध्ये टाटा द्रस्टचे हॉस्पीटल स्थापन करण्यात येणार आहे.
चिखलदर्‍याच्या कॉफीचे ब्रॅडिंग
चिखलदर्‍याच्या कॉफीचे ब्रॅडिंग करून येथील आदिवासी महिलांना आर्थिक सक्षम करण्यावर भर देण्यात येणार आहे. लाडक्या बहिणींची योजना सुरुच राहणार आहे. शिवाय २०२६ मध्ये अमरावती जिल्ह्यात १ लाख लखपती दिदी बनवायच्या आहेत. शहराच्या विकासावर भर देण्यात येत असून राजकमल ब्रीजसाठी १२५ कोटी मिळाले आहे. तुकडेबंदी कायदा अंतर्गत अमरावतीत १ लक्ष घरांचे पट्टेवाटप करण्यात येणार असल्याचे पालकमंत्री यांनी सांगितले. विविध पुरस्कारांचे वितरण आणि एकल महिलांना उपयुक्त ठरणार्‍या पुस्तकाचे विमोचन करण्यात आले. महिला व बालकल्याण विभागाच्या पोर्टलचे यावेळी लोकार्पण करण्यात आले. प्रास्ताविक मुख्य कार्यकारी अधिकारी महापात्र यांनी केले. सूत्रसंचालन क्षिप्रा मानकर यांनी केले.
Powered By Sangraha 9.0