आमच्या विरोधात पोलिसात खोटी तक्रार

08 Mar 2026 22:29:41
- ठाणाच्या सरपंचसह आठ जणांची पत्र परिषदेतून माहिती ः निष्पक्ष चौकशीची मागणी

आमगाव, 
False police complaint तालुक्यातील ठाणा गावात प्रवेशद्वाराचे बांधकाम करताना शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचे खोटे आरोप करून राजेंद्र कमलाप्रसाद वंजारी (रा. ठाणा) यांनी आमगाव पोलिसात खोटी तक्रार नोंदविल्याचा आरोप ठाणा येथील सरपंच छाया देशकर यांच्यासह आठ नागरिकांनी रविवार ७ मार्च रोजी येथे आयोजित पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केला आहे. तर या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्यात यावी अशी मागणीही त्यांनी केली आहे.
 
 
takraa
 
False police complaint यावेळी सरपंच छाया अनिल देशकर, प्रदीपकुमार बावनथडे, सुरेश मेश्राम, सुरेशराम मंगरु कटरे, गुणवंता मेश्राम, हिराबाई खोब्रागडे, सदाशिव भेलावे व हेमंत फुंडे उपस्थित होते. पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीनुसार ठाणा येथे सौंदर्यीकरणाच्या दृष्टीकोनातून गावातील हेमंत फुंडे यांच्या मुलाच्या स्मृतिप्रीत्यर्थ ग्रामपंचायततर्फे नाहरकत प्रमाणपत्र घेऊन बसस्टँड परिसरात ठाणा-गिधाडी मार्गावर प्रवेशद्वार उभारण्याचे काम करण्यात आले होते. दरम्यान, बांधकाम पूर्ण झाल्यानंतर सदर प्रवेशद्वार ग्रामपंचायतीला हस्तांतरित करण्यात आले. दरम्यान, या प्रवेशद्वाराच्या बांधकामासाठी लागणारे साहित्य व लागणारे पाणी ठाणा येथील प्रमिलाबाई कमलाप्रसाद वंजारी यांच्या घरून घेण्यात आले. मात्र बांधकाम पूर्ण झाल्यानंतर २७ फेब्रुवारी रोजी राजेंद्र वंजारी यांनी आमगाव पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करून संबंधित आठ नागरिकांवर घरात प्रवेश करून तार कंपाउंड तोडल्याचा तसेच आई-बहिणींना जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप केला. मात्र हे सर्व आरोप निरर्थक असून सार्वजनिक बांधकाम विभाग, आमगाव यांच्या पत्रानुसार गाव नकाशानुसार रस्त्याची रुंदी १२.४० मीटर असून गेटचे बांधकाम ११.४० मीटरमध्ये करण्यात आले असल्याने ते शासकीय जागेतच असल्याचे सरपंच यांनी स्पष्ट केले आहे. तर राजेंद्र वंजारी, त्यांची आई प्रमिलाबाई वंजारी तसेच त्यांच्या बहिणीकडून सतत शिवीगाळ करून मानसिक त्रास दिला जात असल्याचा आरोपही यावेळी सरपंच व इतर सातही जणांनी केला आहे. तेव्हा या प्रकरणाची सखोल चौकशी करून आम्हाला न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.
Powered By Sangraha 9.0