आर्थिक चणचणीमुळे ते बनले तोतया आयकर अधिकारी

08 Mar 2026 22:09:17
वर्धा, 
fraud तोतया आयकर अधिकार्‍यांना रामनगर पोलिसांनी अटक करून त्यांची पोलिस कोठडी मिळविली. पोलिस कोठडीदरम्यान या प्रकरणातील आरोपींनी बेरोजगारी व आर्थिक चणचणीमुळे हे पाऊल उचलल्याची कबुली दिली आहे. पोलिस कोठडी संपत असल्याने आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. विशेष म्हणजे या प्रकरणातील तिन्ही आरोपींपैकी दोघे उच्च शिक्षित आहेत.
 
 
frai
 
यवतमाळ जिल्ह्याच्या दारव्हा तालुयातील कोहळा येथील चेतन चव्हाण याने अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केले आहे. मात्र तो बेरोजगार होता. आईच्या शस्त्रक्रियेसाठी त्याने ४ लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. हे कर्ज कसे फेडायचे या विवंचनेत तो मागील काही महिन्यांपासून होता. दरम्यान त्याची ओळख वर्धा नजिकच्या बोरगाव मेघे येथील किसन पर्बत याच्याशी झाली. दोघे काही महिन्यांपर्यंत नागपूर येथे भाड्याच्या घरात राहत होते. किसन शिक्षणासोबत शेअर मार्केटमध्ये व्यवहार करत होता. मात्र, बेरोजगारीमुळे हे दोघेही त्रस्त होते. त्यामुळे त्यांनी आयकर अधिकारी बनून फसवणूक करण्याची योजना आखली. पण, ते अखेर पोलिसांच्या हाती लागले. तर या प्रकरणातील तिसरा आरोपी अभिषेक विश्वकर्मा याला या योजनेबद्दल कोणतीही माहिती नव्हती. चेतन आणि किसन यांनी कार भाड्याने घेतली होती. त्या वाहनावर अभिषेक चालक म्हणून कार्यरत होता. शनिवारी या तिघांनाही पोलिस कोठडी संपत असल्याने न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली.
चॅट जीपीटीद्वारे मिळवली माहिती
fraud  आरोपी किसनने आयकर विभागाबद्दल काही माहिती चॅट जीपीटीद्वारे मिळवली होती. तसेच विभागाचे ओळखपत्र कसे तयार केले जातात, याबाबतही त्याने माहिती शोधली होती. त्यानंतर नागपुरातून त्या आयडी कार्डचे प्रिंट काढण्यात आले. ओळखपत्र आणि वॉरंट घेऊन ते येथील चिंतामण कोंगरे यांच्या घरी पोहोचले. हा त्यांचा पहिलाच प्रयोग फसला आणि ते पोलिसांच्या हाती लागले. पोलिसांनी आरोपींकडून ५ मोबाईल, कार आणि सुमारे १३ हजार रुपये रोख जप्त केली आहे. शिवाय ओळखपत्र आरोपींनी नागपूर येथे प्रिंट केल्याने या संदर्भात पोलिसांनी नागपुरातही तपास सुरू केला आहे.
Powered By Sangraha 9.0