शाळेत मुलींना 'लाठीकाठी'चे धडे अन् महिन्याला 2000 रुपये

08 Mar 2026 15:35:58
 सांगली,
Chandrakant Patil'महिला सबलीकरण ही केवळ महिलांची जबाबदारी नसून, समाजातील प्रत्येकाचे ते कर्तव्य आहे,' असे प्रतिपादन करत उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगलीत विद्यार्थिनींसाठी मोठ्या घोषणा केल्या. आगामी शैक्षणिक वर्षापासून (जून महिना) राज्यातील शाळांमध्ये मुलींना स्वसंरक्षणासाठी लाठीकाठीचे प्रशिक्षण दिले जाणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. सांगली जिल्हा प्रशासनाच्या वतीने राबवण्यात आलेल्या 'कन्या सबलीकरण' उपक्रमांतर्गत कराटे प्रशिक्षण पूर्ण केलेल्या मुलींना 'येलो बेल्ट' आणि प्रमाणपत्र वाटप करण्याचा सोहळा रविवारी पार पडला. यावेळी मंत्री पाटील यांनी मुलींच्या आर्थिक आणि शारीरिक सक्षमीकरणावर भर दिला.
 
 

chandrakant patil 
चंद्रकांत पाटील यांच्या महत्त्वाच्या घोषणा
राज्यातील महाविद्यालयांत शिकणाऱ्या 5 लाख विद्यार्थिनींची कॉलेज आणि हॉस्टेल फी आधीच माफ करण्यात आली आहे. आता त्यापुढे जाऊन, 'कमवा आणि शिका' योजनेच्या माध्यमातून पात्र मुलींना दरमहा 2000 रुपये मानधन दिले जाणार आहे.
केवळ मार्शल आर्ट्सच नव्हे, तर महाराष्ट्राची पारंपरिक कला असलेली 'लाठीकाठी' आता जूनपासून प्रत्येक शाळेत शिकवली जाईल.
'आता माझं म्हातारपण सुखरूप'
या कार्यक्रमाला खासदार विशाल पाटील यांचीही प्रमुख उपस्थिती होती. मुलींचे स्वसंरक्षणातील कौशल्य पाहून त्यांनी मिश्किल टिप्पणी केली. ते म्हणाले, "मला स्वतःला दोन मुली आहेत. आज या मुलींचे कराटेमधील कसब पाहून मला खात्री पटली आहे की, माझं म्हातारपण आता नक्कीच सुखरूप जाईल." त्यांच्या या विधानाने सभागृहात एकच हशा पिकला. या सोहळ्याला आमदार इद्रिस नायकवडी, जिल्हाधिकारी अशोक काकडे, पोलीस अधीक्षक संदीप घुगे आणि हजारो प्रशिक्षणार्थी विद्यार्थिनी उपस्थित होत्या.
Powered By Sangraha 9.0