मतिमंद सुनेवर सासरा, दिराचा अत्याचार

08 Mar 2026 11:39:11
चांदूर रेल्वे,
Chandur Railway, घर म्हणजे सुरक्षितता, आधार आणि विश्वासाचे स्थान मानले जाते. मात्र जेव्हा हाच विश्वास घरातील नात्यांकडून तुडवला जातो, तेव्हा ती वेदना अधिक असह्य ठरते. चांदूर रेल्वे पोलिस स्टेशन हद्दीतील एका गावात नातेसंबंधांना काळिमा फासणारी संतापजनक घटना ६ मार्च रोजी उघडकीस आली आहे. ६९ वर्षीय सासरा आणि दिराने आपल्या मतिमंद सुनेवर मागील दोन महिन्यांपासून वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून या प्रकरणी पोलिसांनी सासर्‍याला अटक केली आहे, तर दुसरा आरोपी फरार झाला आहे.
 

Chandur Railway, 
पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिलेचे लग्न सुमारे तीन वर्षांपूर्वी झाले होते. तिचा पतीही मतिमंद असल्याने घरातील परिस्थितीचा गैरफायदा घेत सासरा आणि दीर यांनी गेल्या दोन महिन्यांपासून पीडितेवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. या अमानुष प्रकारामुळे त्रस्त झालेल्या पीडितेने अखेर आपली व्यथा आईसमोर व्यक्त केली. त्यानंतर पीडितेची आई चांदूर रेल्वे पोलिस ठाण्यात दाखल झाली आणि संपूर्ण प्रकाराची माहिती पोलिसांना दिली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तातडीने गुन्हा दाखल केला. पीडितेच्या आईच्या तक्रारीवरून दोन्ही आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या प्रकरणात सासर्‍याला अटक करण्यात आली असून आरोपी दीर सध्या फरार आहे. त्याचा शोध घेण्यासाठी पोलिस पथके रवाना करण्यात आली आहेत. घरातील नात्यांनीच विश्वासघात करत एका असहाय्य मतिमंद महिलेवर अत्याचार केल्याच्या या घटनेमुळे परिसरात संतापाची लाट उसळली आहे. फरार आरोपीला तातडीने अटक करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
Powered By Sangraha 9.0