पदवीधर पूजा चालविते ‘ई-रिक्षा’

08 Mar 2026 11:28:34
किशोर मेटे

चांदूर बाजार,
Pooja Wankhede बुद्धिमत्तेला परिश्रमाची जोड लाभल्यास असामान्य कर्तृत्व घडल्याशिवाय राहत नाही. असेच असामान्य कर्तृत्व घडवले आहे, चांदूर बाजार येथील पूजा संतोष वानखेडे हिने. उच्चशिक्षित असूनही पूजाने आपल्या परिवाराचा समर्थपणे गाडा चालवण्याकरिता चांदूर बाजार तालुक्यात ई-रिक्षा चालविणे पसंत केले आहे.
 


Pooja Wankhede 
पूजाचे वय फक्त २२ वर्षे असून शिक्षण बी.एस.सी. कॉम्प्यूटर झाले आहे. तरीही हिम्मतीने तिने हा व्यवसाय निवडला. आज ती या व्यवसायातून दिवसाकाठी चारशे ते पाचशे रूपये कमावत आहे. शिक्षण किंवा व्यवसाय हा कधीच लहान नसतो. महत्वाचे असते ते परिस्थितीवर मात करून आपल्या पायावर खंबीरपणे उभे राहणे. हा एक आदर्श पूजाने समवयस्क पिढीला घालून दिला आहे.
पूजा सहा महिन्याची असतांनाच वडील वारले. भाऊ नाही, बहीण नाही. घरात सहा महिन्याच्या पूजाला घेऊन आईने तिचे पालनपोषण केले. आशासेविकेचे काम स्वीकारले. पूजाचे शिक्षण पूर्ण केले. म्हणूनच आईच आपला आदर्श असल्याचे पूजा सांगते.
नाही म्हणायला Pooja Wankhede महानगरांमध्ये काही महिला प्रवासी रिक्षा चालवतात.त्यांनाही अनिच्छेने हा व्यवसाय स्वीकारावा लागला. मात्र पूजाचे तसे नाही. शिक्षण असूनही व्यवसायच करायचा, या ईर्षेने ती प्रवासी रिक्षा चालवायच्या व्यवसायात उतरली आहे. याबाबत बोलताना ती म्हणते, माझे शिक्षण बी.एस.सी. कॉम्प्यूटर झाले असले तरी मला नोकरीच्या मागे न लागता व्यवसायच करायचा, हे मी ठरविले होते. परंतु इतर कोणत्याही व्यवसायात पैसा गुंतवायला एवढी चांगली परिस्थिती नव्हती. अशातच पंचायत समितीमार्फत महिलांना व्यवसायासाठी ई रिक्षा वाटपाची योजना आली. मी अर्ज केला. माझी त्यासाठी निवड झाली. आज मी माझ्या या व्यवसायात समाधानी आहे. तिच्या रिक्षातून माधान येथून रोज येणे जाणे करणारी विद्यार्थीनी तृप्ती वाघमारे म्हणते, महिला ई-रिक्षा चालक आम्हाला मैत्रिणीसारखी वाटते. महिला रिक्षाचालकाच्या रिक्षात बसल्यानंतर आम्हाला सुरक्षित वाटते. भीती वाटत नाही.
Powered By Sangraha 9.0