- आ. बडोले यांचा पुढाकार ः आरोग्यमंत्री घेणार आढावा
- विधानसभा क्षेत्रातील आरोग्य सुविधांबाबात होणार चर्चा
अर्जुनी मोरगाव/गोंदिया,
ग्रामीण भागातील आरोग्य सुविधा अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने मंत्रालयात मंगळवार १० मार्च रोजी विशेष बैठक आयोजित करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, माजी मंत्री तथा विद्यमान आमदार Rajkumjar Badole राजकुमार बडोले यांच्या मागणीवरून या बैठकीचे आयोजन करण्यात आले असून बैठकीत अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रातील आरोग्य सेवांचा आढावा घेण्यात येणार आहे.
Rajkumjar Badole अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रातील नागरिकांना दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध व्हाव्यात, ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम व्हावी तसेच आरोग्य सेवा पुरवठ्यातील अडचणी दूर व्हाव्यात, या उद्देशाने ही बैठक बोलावण्यात आली असून बैठकीच्या अध्यक्षस्थानी राज्याचे आरोग्य मंत्री प्रकाश आबीटकर राहणार आहेत. यावेळी बैठकीला आमदार राजकुमार बडोले यांच्यासह आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहेत. अर्जुनी-मोर परिसरात प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्रे आणि ग्रामीण रुग्णालये कार्यरत असली तरी अनेक ठिकाणी डॉक्टरांची कमतरता, तज्ज्ञ वैद्यकीय सेवा अपुरी असणे, तसेच आवश्यक वैद्यकीय उपकरणांची कमतरता अशा समस्या नागरिकांना भेडसावत असल्याची बाब आ. बडोले यांनी समोर आणून दिली आहे. या पार्श्वभूमीवर सदर बैठक आयोजित करण्यात आली असून ही आढावा बैठक राज्यातील ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्थेसाठी महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, संबंधित अधिकार्यांना बैठकीपूर्वी सविस्तर माहिती व अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या अहवालात अर्जुनी-मोर विधानसभा क्षेत्रातील प्राथमिक आरोग्य केंद्रांची स्थिती, ग्रामीण रुग्णालयांमधील उपलब्ध सुविधा, डॉक्टर व नर्सिंग स्टाफची उपलब्धता, औषधांचा पुरवठा, आपत्कालीन वैद्यकीय सेवा तसेच मातृ व बाल आरोग्य सेवांचा आढावा सादर केला जाणार आहे. त्याचबरोबर आरोग्य सेवा सुधारण्यासाठी आवश्यक असलेल्या उपाययोजनांवरही सविस्तर चर्चा होण्याची शक्यता आहे. दरम्यान, आ. बडोले यांच्या मागणीवरून आयोजित करण्यात आलेली ही अर्जुनी-मोर आरोग्य सेवा आढावा बैठक स्थानिक आरोग्य व्यवस्थेत सकारात्मक बदल घडवून आणण्याच्या दृष्टीने महत्त्वाची ठरण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
फुटाळा येथील घटनेतील दोषींवर कारवाई होणार
संपूर्ण गोंदिया जिल्हा अतिदुर्गम असल्याने मंत्री महोदयांनी पुर्ण जिल्ह्याचा आढावा या बैठकीत घ्यावा अशी अपेक्षा आहे. त्यातच फुटाळा येथील तलावात बुडालेल्या दोन मुलांचा वेळेवर ऑक्सीजन न मिळाल्याने मृत्यू झाल्याची घटना अत्यंत दुर्देवी असून त्यात सौंदड ग्रामीण रुग्णालयातील रुग्णावाहिका वेळेवर न मिळने व तेथील डॉक्टरांच्या अनुपस्थितीबाबतही माहिती प्राप्त झाली आहे. या संदर्भात मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री यांच्याशी चर्चा केली असून तसे लक्षवेधीही लागणार आहे. तर मंगळवारच्या बैठकीतही हा मुद्दा उपस्थित करून दोषींवर कारवाईची मागणी करण्यात येणार आहे.
- राजकुमार बडोले, आमदार, अर्जुनी मोरगाव