सातारा,
Santosh Deshmukh murder case, मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर खळबळ उडाली होती. अत्यंत क्रूरपणे केलेल्या हत्येमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. या प्रकरणातील सर्व आरोपी तुरूंगात असून मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. मात्र, या प्रकरणातील एक आरोपी अद्याप फरार असून त्याचा शोध पोलिस वर्षभरापासून घेत आहेत.
याप्रकरणात एक मोठा अपडेट समोर आला आहे. आरोपी जयराम चाटे याला जिल्हा न्यायालयाने दिवंगत भाऊ श्रीराम चाटे यांच्या बाराव्या दिवसाच्या धार्मिक विधीसाठी तात्पुरती परवानगी दिली आहे. न्यायालयाने 13 मार्च रोजी सकाळी 9 वाजता ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत पोलिस बंदोबस्तात उपस्थित राहण्याची परवानगी मंजूर केली आहे. मकोका विशेष न्यायाधीश व्ही. एच. पाटवदकर यांनी मानवतावादी दृष्टिकोनातून हा निर्णय दिला आहे.
कोर्टाने परवानगी देताना Santosh Deshmukh murder case, आरोपीवर काही नियम आणि अटी लादल्या आहेत. आरोपीला पोलिस बंदोबस्तात घेऊन त्याच्या गावात नेले जाईल आणि विधी संपल्यानंतर काही तासांत तो परत तुरूंगात आणला जाईल. आरोपीच्या वकिलांनी सर्व अटींचे पालन करण्यास तयार असल्याचे सांगितले, तसेच पोलिस बंदोबस्ताचा खर्चही भरण्याची तयारी दर्शवली. सरकारी पक्षाने आरोपीवर गंभीर गुन्हे असल्यामुळे त्याला बाहेर सोडल्यास कायदा व सुव्यवस्थेवर परिणाम होऊ शकतो, असा युक्तिवाद केला, परंतु न्यायालयाने दोन्ही बाजू ऐकल्यानंतर मर्यादित एक दिवसाची परवानगी मंजूर केली.हा निर्णय खास महत्त्वाचा आहे, कारण संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर 14 महिन्यांपर्यंत कोणालाही आरोपीला तुरूंगाबाहेर जाण्याची परवानगी मिळाली नव्हती. आता जयराम चाटेला 14 महिन्यानंतर काही तासांसाठी गावी जाऊन धार्मिक विधी करण्याची संधी मिळाली आहे.