यवतमाळच्या विकासासाठी कटिबद्ध : अॅड. प्रियदर्शनी उईके
राळेगाव,
Adv. Priyadarshini Uike आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून यवतमाळ नगर परिषदेच्या नवनिर्वाचित अध्यक्ष अॅड. प्रियदर्शनी उईके यांचा राळेगाव येथे रविवार, 8 मार्च रोजी विविध सामाजिक, धार्मिक व व्यापारी संस्थांच्या संयुक्त विद्यमाने भव्य नागरी सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला नागरिकांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती लाभली होती. उत्साहपूर्ण वातावरणात हा सोहळा पार पडला. राळेगाव शहरातील त्रिमूर्ती मंगल कार्यालय येथे संध्याकाळी आयोजित या कार्यक्रमात यतमाळ नप अध्यक्ष अॅड. प्रियदर्शनी उईके यांना शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. यवतमाळ नगर परिषदेच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल तसेच महिला नेतृत्वाला बळ देणाèया या ऐतिहासिक यशाबद्दल त्यांचा गौरव करण्यात आल्याचे आयोजकांनी सांगितले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते दीपक एंबडवार होते, तर राज्याचे मंत्री डॉ. अशोक उईके यांची विशेष उपस्थिती लाभली. यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून भूपेंद्र कारिया, अॅड. प्रफुल्लसिंह चौहान, अशोक केवटे, छाया पिंपरे, अंकुश रामगडे, चित्तरंजन कोल्हे, नारायण काकडे, डॉ. ज्ञानेश्वर मुडे, हरिभाऊ पंढरपुरे, मधुकर गेडाम, फिरोज लाखानी यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.
Adv. Priyadarshini Uike या प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतातून नप अध्यक्ष अॅड. प्रियदर्शनी उईके यांच्या निवडीबद्दल अभिनंदन करत त्यांच्या नेतृत्वात यवतमाळ शहराचा सर्वांगीण विकास होईल, असा विश्वास व्यक्त केला. महिलांना राजकारण व प्रशासनात नेतृत्वाच्या संधी मिळत असून, समाजाच्या प्रगतीसाठी महिला नेतृत्व अधिक प्रभावी ठरत असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले. सत्काराला उत्तर देताना अॅड. उईके म्हणाल्या, राळेगाव विधानसभा मतदारसंघ हा माझे वडील मंत्री तथा आमदार डॉ. अशोक उईके यांचे कार्यक्षेत्र असून या मतदारसंघातील जनतेने आमच्या कुटुंबावर नेहमीच विश्वास आणि प्रेम व्यक्त केले आहे. या परिसरातून मिळालेला जनतेचा आशीर्वाद आणि पाठबळ हीच माझी खरी ताकद आहे.
Adv. Priyadarshini Uike यवतमाळ शहराच्या सर्वांगीण विकासासाठी पारदर्शक, लोकाभिमुख आणि विकासाभिमुख प्रशासन देण्याचा मी प्रयत्न करणार आहे. विशेषतः महिला सक्षमीकरण, पायाभूत सुविधा, स्वच्छता, आरोग्य आणि नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी प्रामाणिकपणे काम करणे हीच माझी प्राथमिकता राहील, असेही त्या म्हणाल्या.
कार्यक्रमाला राळेगाव शहर व परिसरातील नागरिक, विविध सामाजिक संस्था, व्यापारी संघटना तसेच विविध क्षेत्रांतील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.