अंधारातून प्रकाशाकडे..!

09 Mar 2026 22:07:23
बीएएमएस डॉ. रेश्मा कंकाळ यांचा पुनर्जन्म

यवतमाळ, 
कधी काळी रुग्णांच्या वेदना कमी करणारे हात स्वतःच्याच वेदनांनी थरथरू लागले, आणि आयुष्य एका खोल दरीत कोसळलं. ही कहाणी आहे बीएएमएस पदवीधर डॉक्टर रेश्मा कंकाळ यांचीएक वेदनादायी, पण तितकीच आशादायी गाथा. 2019 साली रेश्मा यांचं मानसिक संतुलन ढासळलं. तीव्र नैराश्य, संशय, भीती आणि हळूहळू वास्तवापासून तुटत जाणं. घरात स्वतःला बंदिस्त करणं, बाहुल्यांना लेकरू समजून त्यांच्याशी बोलणं, आणि स्वतःच्या चिमुकल्या बाळाला पेटीत कोंडून ठेवणंही परिस्थिती किती भीषण असेल, याची कल्पनाच करवत नाही. एका दुर्दैवी प्रसंगात वडिलांचा मृत्यू झाला. सहा महिने कारावास भोगावा लागला. आईने निवेदन बदलून मुलीला बाहेर काढलं. पण समाज, नातेवाईक, सगळेच दूर गेले. घर अंधारात बुडालं. वीज कापलेली, कचèयाचे ढीग, असह्य दुर्गंध आणि त्या अंधारात हरवलेली रेश्मा, अशी स्थिती होती.
 
 
nan
 
तेव्हा पुढे सरसावले अकोला खदानचे पोलिस ठाणेदार मनोज केदारे. त्यांनी धाडसाने घरात प्रवेश केला. एका पेटीत कोंडलेलं बाळ सापडलं.कुपोषित, अशक्त. बालकल्याण समितीमार्फत त्या लेकराची तातडीने व्यवस्था करण्यात आली आणि रेश्मासाठी एक आशेचा हात पुढे केलानंददीप फाऊंडेशन..! नंददीपचे पुनर्वसन समन्वयक निशांत शायरे तातडीने पोहोचले. संदीप, नंदिनी आणि बबन घोडेस्वार यांच्या सेवाभावाने रेश्माला सुरक्षितपणे निवाèयात आणण्यात आले. त्या क्षणापासून सुरू झाली तीन महिन्यांची उपचारयात्रा. मानसोपचार तज्ञ डॉ. श्रीकांत मेश्राम यांच्या मार्गदर्शनात औषधोपचार, समुपदेशन आणि सातत्यपूर्ण निरीक्षण सुरू झाले. यवतमाळच्या निमा परिवारातून माजी अध्यक्ष डॉ. प्रवीण राखुंडे यांनी अथक परिश्रम घेतले. त्यांच्यासोबत डॉ. अग्रवाल आणि डॉ. कविता बोरकर यांनीही सातत्याने साथ दिली.
 
 
त्वचारोग तज्ञ डॉ. अमर सुरजुसे यांनी खाज-खरुजग्रस्त बांधवांवर उपचार करताना रेश्माला पुन्हा तिच्या अस्तित्वाची जाणीव करून दिली. ‘तू डॉक्टर आहेस’, त्या एका वाक्याने तिच्या आयुष्यात नवा प्रकाश फुलला.
डॉ. रेश्मा ती सकाळी सात ते दहा न चुकता सेवा करू लागली. जखमा धुवू लागली, ड्रेसिंग करू लागली, साठ-सत्तर रुग्णांची तपासणी करू लागली. पोलिस कवायतदार महेश कळसकर यांच्या व्यायाम सत्रांनी तिच्या शरीरात जोम आला. मार्गदर्शक नरेंद्र पवार यांच्या प्रेरणेने आत्मविश्वास वाढला.
 
 
हळूहळू रेश्मा रुग्ण न राहता सेविका बनली. नंददीप तिचं हरवलेलं घर ठरलं आणि मग आला तो दिवस. भव्य महापुनर्वसन बिदाई सोहळा. उपस्थित मान्यवरांमध्ये यवतमाळ नगर परिषद अध्यक्ष अ‍ॅड. प्रियदर्शनी उईके यांच्यासह अनेक मान्यवर होते. 35 जणांच्या सन्मानपूर्वक घरवापसीसोबत डॉ. रेश्माचाही पुनर्जन्म साजरा झाला.
अकोल्यात पोहोचल्यावर ठाणेदार मनोज केदारे यांच्या डोळ्यांत अश्रू तरळले. आई आणि भाऊ रडत मिठीत सामावले. ‘आम्हाला विश्वास नव्हता ती परत येईल..’, आईच्या अश्रूंंनी सगळं सांगितलं. केदारे म्हणाले, ‘नंददीप म्हणजे हरवलेल्यांचं घर..!’
 
 
निघताना रेश्मा संदीप आणि नंदिनी यांच्या पाया पडली. तुम्ही देव आहात, मला पुनर्जन्म दिला. ही कथा केवळ एका डॉक्टरची नाही; ही आहे विश्वासाची, सातत्याची आणि मानवतेच्या सेवेची.
नंददीप फाउंडेशनच्या या कार्याला जागतिक स्तरावरही गौरव मिळाला आहे. हाँगकाँग येथे प्रदान करण्यात आलेला सन्मान हा केवळ पुरस्कार नाही, तर तो यवतमाळकरांच्या विश्वासाची पावती आहे.
यवतमाळ नागरी सत्कार समिती यांनी हजारोंच्या उपस्थितीत केलेला भव्य नागरी सत्कार हा जनतेच्या प्रेमाचा वर्षाव होता. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ यांचा पुरस्कार, जिजामाता पुरस्कार, तसेच आम्ही सारे कार्यकर्ते सन्मानहे सारे पुरस्कार नंददीपच्या सेवाव्रताची साक्ष देतात.
हीच प्रेरणा आहे संत गाडगेबाबा यांच्या विचारांची स्वच्छता, सेवा आणि मानवतेचा धर्म. डॉ. रेश्मा कंकाळ आज केवळ बरी नाही. ती जिवंत उदाहरण आहे. अंधार कितीही दाट असो, एक विश्वासाचा दिवा पुरेसा असतो, अगदी तसेच.
Powered By Sangraha 9.0