नवी दिल्ली,
Disruption of seasonal cycles in India भारत हे नेहमीच विविध ऋतूंच्या ओळखीसाठी प्रसिद्ध आहे. उन्हाळा, पावसाळा, हिवाळा या ऋतूंवर आधारित अनेक सण आणि उत्सव साजरे केले जातात. मात्र, आता या पारंपारिक ऋतूचक्राचे संतुलन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. पृथ्वीच्या वाढत्या उष्णतेमुळे निसर्गाची लय हरवत चालली आहे, अशी गंभीर सूचना 'विज्ञान आणि पर्यावरण केंद्र' आणि 'डाउन टू अर्थ' यांच्या अहवालातून देण्यात आली आहे. अहवाल तयार करताना हवामान विभाग आणि आपत्ती व्यवस्थापन विभागांच्या माहितीतून २०१२ ते सप्टेंबर २०२५ या कालावधीत घडलेल्या हवामानातील बदलांचा अभ्यास करण्यात आला. या अभ्यासातून दिसून आले की या १,५०० दिवसांमध्ये भारतात ऋतूविषयक नियमबद्ध बदल जवळजवळ नाहीसे झाले आहेत. आधी स्पष्टपणे जाणवणारा उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा आता एकमेकांत मिसळले आहेत. काही ठिकाणी हिवाळ्यातही उष्णतेच्या लाटा जाणवल्या, तर उन्हाळ्यात पावसाळा सुरू झाला आहे.
२०२५ मध्ये देशतील सर्व राज्ये प्रभावित
२०२५ च्या पहिल्या नऊ महिन्यांत देशात सुमारे ९९ टक्के दिवस अतिवृष्टी, उष्णतेची लाट, गारपीट किंवा चक्रीवादळ यासारख्या आपत्तींनी प्रभावित झाले. या काळात २७३ दिवसांपैकी जवळजवळ प्रत्येक दिवशी काही ना काही नैसर्गिक आपत्ती झाली. गेल्या चार वर्षांत पहिल्यांदाच संपूर्ण वर्षभर अशा घटनांची नोंद झाली आहे. २०२३ मध्ये फक्त सहा राज्यांमध्ये अशा आपत्ती नोंदल्या गेल्या, तर २०२५ मध्ये देशभरातील सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश प्रभावित झाले. जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये ५९ पैकी ५७ दिवस अतिवृष्टीच्या घटनांनी भरले होते. ऋतू बदलाचा आणखी पुरावा म्हणजे कडक हिवाळ्यातही देशाच्या काही भागात उष्णतेच्या लाटांचा अनुभव घेण्यात आला. मान्सून आता फक्त पावसाळ्यापुरता मर्यादित राहिला नाही, तर तीव्र उष्णता आणि उष्णतेच्या लाटाही अनुभवाव्या लागल्या. नोव्हेंबरपर्यंत पडणाऱ्या पावसामुळे खरीप व रब्बी पिकांच्या कापणीवरही परिणाम झाला आहे. हवामान बदलामुळे भारताचा नैसर्गिक नकाशा बदलू लागला आहे.
मार्च महिना संपण्यापूर्वीच शाळांना सुट्ट्या
वाळवंटी भागात पूर तर पर्वतीय भागात उष्णतेच्या लाटांमुळे परिस्थिती बिघडत आहे. हिमालयातील हिमनद्या वेगाने वितळत आहेत, डोंगराळ भागांत नैसर्गिक समतोल बिघडत आहे. मानवी इतिहासात कधीही इतकी घातक ग्रीनहाऊस वायूंची पातळी नव्हती. अहवालात म्हटले आहे की, जर कठोर पावले उचलली नाहीत, तर आपल्या प्रगतीसाठी महत्त्वाचा आधार असलेले 'ऋतूचक्र' कायमचे नष्ट होऊ शकते. हवामानातील बदल आता केवळ आकडेवारीपुरते मर्यादित नाहीत, तर आपल्या दैनंदिन जीवनावर प्रत्यक्ष परिणाम करत आहेत. अवकाळी पावसामुळे शेतकरी जून महिन्यात पेरणी करण्यास घाबरतात, तयार झालेले पीक पावसामुळे नष्ट होत आहे. उन्हाची तीव्रता इतकी वाढली आहे की, अनेक ठिकाणी मार्च महिना संपण्यापूर्वीच शाळांना सुट्ट्या द्याव्या लागत आहेत.