मुंबई
Bharat Gogawle बदलत्या हवामानामुळे कोकणातील हापूस आंबा आणि काजू बागायतदारांना मोठा आर्थिक फटका बसला असून, या नुकसानाची भरपाई सरकारने द्यावी, अशी मागणी करत कोकणातील आमदार विधानसभेत एकत्र आले आहेत. हापूस आंबा आणि काजू उत्पादनावर अवकाळी पावसाळी हवामान आणि कडाक्याची थंडी यांचा विपरीत परिणाम झाला आहे. या पार्श्वभूमीवर फलोत्पादन मंत्री भरत गोगावले यांनी अधिवेशन काळात बैठकीत नुकसानभरपाईचा निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन दिले.
कोकणातील हापूस आंबा उत्पादनाची सुरुवात ऑक्टोबर नंतर मोहर लागल्यावर होते. मात्र, बदलत्या हवामानामुळे अनेक बागायतीतील फळे उपजण्यापूर्वीच गळून पडली आहेत. या परिस्थितीने बागायतदारांना आर्थिक संकटात ढकलले आहे, तर काजू बागायतदारांनाही मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागला आहे. शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की, फळे उत्पादनासाठी केलेला खर्च आता परतावा मिळवण्यात अपयशी ठरतो आहे, त्यामुळे त्यांच्या आर्थिक सुरक्षिततेवर गंभीर परिणाम होतो.या विषयावर कोकणातील १५ आमदारांनी मिळून सरकारसमोर मुद्दा मांडला. यात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभव नाईक, नितेश राणे, निलेश राणे, दीपक केसरकर, रत्नागिरीतील किरण सामंत, योगेश कदम, भास्कर जाधव, शेखर निकम, तसेच रायगडातील भरत गोगावले, महेंद्र दळवी, प्रशांत Bharat Gogawle ठाकूर, महेश बालदी, महेंद्र थोरवे, रवी पाटील आणि आदिती तटकरे यांचा समावेश आहे.आमदार आणि बागायतदार यांचा असा विश्वास आहे की, कोकणच्या पिकांना तातडीने नुकसानभरपाई देणे आवश्यक आहे, अन्यथा शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती अधिक ढासळेल. सरकारने पूर्वी इतर कृषी पिकांसाठी भरपाई दिली आहे; मात्र कोकणातील हापूस आणि काजू पिकांसाठी अद्याप ठोस पावले उचललेली नाहीत. या पार्श्वभूमीवर सरकारची नियोजन बैठक आणि ठोस निर्णयाची अपेक्षा बागायतदार आणि स्थानिक समाज दोघांनाही आहे.