- नवेगावबांध उद्यानात सर्वत्र कचरा व प्लास्टिकच्या बाटल्यांचा खच
- व्यवस्थापनावर प्रश्नचिन्ह
सुरेंद्रकुमार ठवरे
अर्जुनी मोरगाव,
गोंदिया जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ असलेल्या Navegaon-Nagzira tourist spot नवेगाव-नागझिराच्या बांध परिसरात वाढत चाललेले प्रदूषण, अस्वच्छता आणि व्यवस्थापनातील गोंधळ यामुळे गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. नैसर्गिक सौंदर्य, विशाल तलाव आणि स्थलांतरित पक्ष्यांसाठी ओळखल्या जाणार्या नवेगाव-नागझिरा वन्यजीव अभयारण्य परिसरात दरवर्षी देश-विदेशातून हजारो पर्यटक भेट देतात. मात्र, अलीकडच्या काळात नवेगावबांध तलाव परिसरात वाढलेल्या प्लास्टिक कचर्यामुळे आणि दुर्लक्षित स्वच्छतेमुळे या पर्यटनस्थळाच्या प्रतिमेला धक्का बसत असल्याची चर्चा स्थानिक नागरिकांमध्ये सुरू आहे. एकंदरीत नवेगाव-नागझिरा पर्यटनस्थळाला प्रदुषणाचा विळखा बसला असल्याचे चित्र सद्या दिसू लागले आहे.
परिसरात फेरफटका मारताना अनेक ठिकाणी प्लास्टिकच्या बाटल्या, पॅकेट्स आणि इतर कचरा विखुरलेला दिसून येतो. काही स्टॉलधारकांकडून साफसफाई केली जात असली तरी कचर्याचे योग्य व्यवस्थापन होत नसल्याचे सांगितले जाते. काही ठिकाणी कचरा जाळला जातो किंवा परिसरातच टाकून दिला जातो. त्यामुळे पर्यावरणीय प्रदूषण वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. यासंदर्भात विचारणा केली असता येथील उपसंचालक प्रीतम कोडापे यांनी याबाबत चौकशी करतो, अशी प्रतिक्रिया दिली. तर स्थानिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार या Navegaon-Nagzira tourist spot पर्यटन स्थळाच्या व्यवस्थापनाची जबाबदारी वनपरिक्षेत्राधिकारी प्रमोद पझारे यांच्याकडे आहे. यावर पझारे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की त्यांच्या जबाबदारीत फक्त लॉजिंग आणि बोर्डिंग व्यवस्थापन येत असून लॉजिंग-बोर्डिंगच्या कंपाउंडच्या बाहेरील परिसर हा सरकारी जागा असल्यामुळे त्या भागाची साफसफाई संबंधित ग्रामपंचायतीने करणे अपेक्षित असल्याचे ते म्हणाले, पझारे यांच्यानुसार ग्रामपंचायतीला अनेक वेळा पत्र देऊनही साफसफाईबाबत अपेक्षित कारवाई होत नाही. परिस्थिती बिघडू नये म्हणून कधी कधी त्यांच्या कर्मचार्यांकडूनच साफसफाई केली जाते. तसेच येथे मनुष्यबळ आणि निधीची कमतरता असल्याचेही त्यांनी सांगितले. मात्र, गार्डन, तलाव परिसर आणि सार्वजनिक पर्यटन सुविधा यांची देखभाल नेमकी कोण करणार, असा सवाल या निमीत्ताने उपस्थित होत असून नवेगावबांध प्रदुषणाच्या विळख्यात अडकल्याचे दिसून येत आहे.
संध्याकाळनंतर अंधाराचे साम्राज्य...
येथील काही ठिकाणातील विद्युत कनेक्शनही बंद पडल्याची माहिती असून संध्याकाळनंतर परिसरात अंधाराचे साम्राज्य निर्माण होत असल्याचे सांगितले जाते. याशिवाय येथे असलेल्या लॉजिंग आणि बोर्डिंग सुविधांची स्थितीही समाधानकारक नसल्याच्या तक्रारी पुढे येत आहेत.
शासन प्रशासनाचे दुर्लक्ष ...
या प्रश्नाकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी माजी जि. प. सदस्य किशोर तरोणे यांनी आ. राजकुमार बडोले आणि जिल्हाधिकार्यांना पत्र लिहून तक्रार नोंदवली आहे. तसेच नवेगाव फाउंडेशनचे रामदास बोरकर यांनीही संबंधित विभागाकडे आणि जिल्हाधिकार्यांकडे तक्रार केल्याचे सांगितले जाते. मात्र अद्याप ठोस कारवाई झालेली नसल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.