सौदी अरेबियामधील हल्ल्यात एकही भारतीय मृत नाही!

09 Mar 2026 10:08:33
रियाद,
No Indian dead in Saudi Arabia attack मध्यपूर्वेत वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर सौदी अरेबियामधून भारतासाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. . इराण आणि इस्रायल यांच्यातील संघर्षामुळे परिसरात अस्थिरता वाढली असतानाच सौदी अरेबियातील अल खर्ज भागात झालेल्या क्षेपणास्त्र हल्ल्याबाबत भारतीय नागरिक सुरक्षित असल्याची माहिती देण्यात आली आहे. रियाध येथील भारतीय दूतावासाने दिलेल्या माहितीनुसार, अल खर्जमध्ये घडलेल्या या घटनेत एकाही भारतीयाचा मृत्यू झालेला नाही. ही बातमी सौदी अरेबियात काम करणाऱ्या लाखो भारतीयांसाठी आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी मोठा दिलासा देणारी ठरली आहे.
 

Saudi Arabia attack 
 
सौदी नागरी संरक्षण विभागाने दिलेल्या माहितीनुसार, अल खर्ज प्रांतातील निवासी भागात एक लष्करी क्षेपणास्त्र पडले. या दुर्घटनेत दोन बांगलादेशी नागरिकांचा मृत्यू झाला असून अकरा जण जखमी झाले. जखमींमध्ये एका भारतीय नागरिकाचाही समावेश आहे, मात्र त्याची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले आहे.भारतीय दूतावासाने तात्काळ निवेदन जारी करून सांगितले की, या घटनेबाबत ते सौदी प्रशासनाशी सातत्याने संपर्कात आहेत. दूतावासातील वाणिज्य व नागरिक कल्याण विभागाचे समुपदेशक वाय. साबीर यांनी रात्रीच अल खर्ज येथे जाऊन जखमी भारतीयाची भेट घेतली. त्याच्यावर तेथील सरकारी रुग्णालयात उपचार सुरू असून त्याची योग्य काळजी घेतली जात असल्याची माहिती देण्यात आली.
 
या घटनेची माहिती भारताच्या परराष्ट्र मंत्रालयासह संबंधित विभागांनाही देण्यात आली आहे. दूतावासाने स्पष्ट केले की, सौदी अधिकाऱ्यांशी समन्वय साधून आवश्यक ती सर्व मदत उपलब्ध करून दिली जात आहे.मध्यपूर्वेत वाढलेल्या संघर्षामुळे क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ल्यांच्या घटना वाढत आहेत. अशा परिस्थितीत सौदी अरेबियात राहणाऱ्या सुमारे २७ लाख भारतीयांच्या सुरक्षेच्या दृष्टीने भारत सरकार सतर्क आहे. जखमी भारतीयाची ओळख अद्याप जाहीर करण्यात आलेली नसली तरी दूतावासाने त्याच्या कुटुंबीयांशी संपर्क साधला आहे. या घटनेबाबत पुढील माहिती मिळाल्यास ती त्वरित कळवण्यात येईल, असेही दूतावासाने स्पष्ट केले आहे.
Powered By Sangraha 9.0