लग्नसोहळ्यांची धामधूम; पण मंगल कार्यालयांबाहेर बेशिस्त पार्किंग

09 Mar 2026 20:11:30
- वाहतूक कोंडी : पार्किंगची व्यवस्था कागदावरच
- रस्त्यावर उभ्या वाहनांमुळे नागरिक त्रस्त

गोंदिया, 
Parking arrangements शहरात सध्या लग्नसराईची धामधूम सुरू असताना मंगल कार्यालये व लॉन्ससमोर वाहनांची मोठी गर्दी होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. अनेक मंगल कार्यालयांकडून पुरेशी पार्किंग व्यवस्था उपलब्ध करून दिली जात नसल्याने वर्‍हाडातील वाहने थेट रस्त्यावर उभी केली जात आहेत. परिणामी शहरातील अनेक भागात वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस तीव्र होत असून नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
 
 
parking
 
Parking arrangements  अलीकडच्या काळात इव्हेंट मॅनेजमेंट संस्था आणि मंगल कार्यालयांकडून विविध पॅकेजेस उपलब्ध करून दिली जात असल्याने विवाहसोहळे मंगल कार्यालयांमध्येच करण्याकडे नागरिकांचा कल वाढला आहे. लग्नविधी एकाच ठिकाणी सोयीस्कर पद्धतीने पार पडत असल्याने हा पर्याय लोकप्रिय ठरत असला तरी त्यातून पार्किंगची गंभीर समस्या निर्माण होत आहे. शहरात अनेक मंगल कार्यालये व लॉन्स आहेत. असे असले तरी बहुतेक ठिकाणी स्वतंत्र आणि पुरेशी पार्किंग व्यवस्था नसल्याने वाहन उभे ठेवण्याचा प्रश्न निर्माण होत आहे. विवाह सोहळ्यासाठी येणारे पाहुणे प्रतिष्ठेचा प्रश्न म्हणून स्वतःच्या वाहनाने येत असल्याने प्रत्येक मंगल कार्यालयासमोर वाहनांची लांबलचक रांग लागते. त्यामुळे मुख्य मार्गांवर वाहतुकीचा वेग मंदावतो आणि गर्दीच्या वेळेत कोंडी निर्माण होते. विशेष म्हणजे शहरात नव्याने उभारण्यात आलेल्या काही मंगल कार्यालयांमध्येही पार्किंगचा पुरेसा विचार झालेला नाही. विवाह सोहळ्याला येणारे नागरिक आपली वाहने रस्त्याच्या कडेला किंवा अस्ताव्यस्त पद्धतीने उभी करतात. शहराच्या मध्यवर्ती भागातील तसेच मुख्य मार्गालगत असलेल्या मंगल कार्यालयांमुळे ही समस्या अधिकच गंभीर होत असून नागरिकांना वाहन काढताना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
 
 
पार्किंग केवळ कागदावरच
महापालिकेकडून मंगल कार्यालयांना बांधकाम परवाना देताना पार्किंगबाबत अटी घालण्यात येतात. मात्र, प्रत्यक्षात इमारत पूर्ण झाल्यानंतर ही पार्किंगची जागा इतर कामांसाठी वापरली जात असल्याचे दिसून येते. त्यामुळे कागदावर असलेली पार्किंग व्यवस्था प्रत्यक्षात गायब होत असल्याची तक्रार नागरिकांकडून केली जात आहे. या प्रकाराकडे महापालिकेने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे.
 
 

शहरात वाहतूक कोंडी वाढत असताना मंगल कार्यालय परिसरातील पार्किंगची समस्या गंभीर बनली आहे. बेशिस्त पार्किंगवर कारवाई केली जात आहे. दरम्यान, मंगल कार्यालयांच्या पार्किंग व्यवस्थेबाबत नगर परिषदेला सूचना देण्यात येणार आहेत.
-नागेश भास्कर
पोलिस निरीक्षक, वाहतूक शाखा, गोंदिया
Powered By Sangraha 9.0