समग्र शिक्षाच्या कर्मचार्‍यांची आजाद मैदानावर धडक

09 Mar 2026 20:14:47
- सेवेत कायम करण्याची मागणी : आमरण उपोषणाला सुरुवात
- गोंदिया जिल्ह्यातील ८० कर्मचार्‍याचा सहभाग

गोंदिया, 
महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागाचे 'Samagra Shiksha Abhiyan' समग्र शिक्षा अभियान अंतर्गत गेली २५ वर्षापासून तुटपुंज्या मानधनावर कंत्राटी कर्मचारी म्हणून सेवेत कार्यरत असलेल्या सर्व केडरच्या सुमारे ३ हजार ३७८ कंत्राटी कर्मचार्‍यांना सेवेत समायोजित करुन कायम करण्यात यावे. या मागणीला घेऊन राज्यातील तीन हजाराच्या वर समग्र शिक्षा अभियानच्या कर्मचार्‍यांनी सोमवार ९ मार्च रोजी मुंबईच्या आझाद मैदानावर धडक देत आमरण उपोषणाला सुरुवात केले आहे. या आंदोलनात गोंदिया जिल्ह्यातील कर्मचार्‍यांनीही आपला सहभाग नोंदवला असून जिल्ह्यातील ८० कर्मचारी मुंबईला रवाना झाले आहे.
 
 
shiksas
 
सर्व शिक्षा अभियान अंतर्गत कार्यरत कर्मचार्‍यांना शासन सेवेत कायम करण्याच्या मागणीला घेऊन 'Samagra Shiksha Abhiyan'  समग्र शिक्षा संघर्ष समितीच्या माध्यमातून अनेकदा आंदोलन करण्यात आले. तसे निवेदनही शासनाला देण्यात आले. या आंदोलनाची दखल घेत कंत्राटी कर्मचार्‍यांना सेवेत कायम करण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अभ्यास समिती देखील गठीत केली. दरम्यान, या अभ्यास समितीने २५ नोव्हेंबर २०२५ रोजी सेवेत कायम करण्याबाबतचा सकारात्मक अहवाल शासनाला सादर केलेला आहे. या अनुषंगाने अहवालातील शिफारस ‘ब’ ला मंजूरी देऊन सर्व कंत्राटी कर्मचार्‍यांना सेवेत कायम करण्यात यावे, यासाठी समग्र शिक्षा संघर्ष समितीच्या नेतृत्वात नागपूर येथील हिवाळी अधिवेशनादरम्यान यशवंत स्टेडियम येथे ८ डिसेंबर ते १२ डिसेंबर २०२५ या कालावधीत तीन हजार कर्मचार्‍यांनी आमरण उपोषणही केले होते. यावेळी आदर्श आचार संहिता संपताच सेवेत कायम करण्याचा शब्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देऊन प्रा. मनोहर धोंडे व आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या हस्ते उपोषण संपवले होते. त्यानंतर आचार संहिता संपुन १ महिन्याचा कालावधी लोटत असताना शासनाने अद्याप कसलाही निर्णय घेतला नाही. त्यामुळे कर्मचार्‍ंयानी पुन्हा आंदोलनाचा हत्यार उपसला असून सोमवारपासून पुन्हा मुंबई येथील आझाद मैदानावर सर्वच कंत्राटी कर्मचारी आंदोलनाला बसले आहेत. दरम्यान, आंदोलनात गोंदिया जिल्ह्यातील समग्र शिक्षा अभियान विभागात कार्यरत सर्व ८० कंत्राटी कर्मचार्‍यांनी सहभाग नोंदवला असून या आंदोलनासाठी मुंबईच्या दिशेने सोमवारी रवाना झाले आहे.
 
 
शिक्षण विभागाची कामे होणार ठप्प
'Samagra Shiksha Abhiyan' समग्रचे सर्व कर्मचारी आंदोलनात सहभागी होत असल्याने मुळे ऐन मार्च एंडींगच्या काळात जिल्ह्यातील शिक्षण विभागातील कामे ठप्प होणार असून यात मार्च महिन्यात सर्व उपक्रमांवर प्राप्त झालेले अनुदान अखर्चित राहणार आहे. जसे शालेय बांधकाम कामे, पीएमश्री योजना, शाळा अनुदान, सर्व ऑनलाइन कामे, २५ टक्के आरटीई प्रवेश प्रक्रिया, व्यवसाय शिक्षण अनुदान, मोफत गणवेश व पाठ्यपुस्तक मागणी आदी कामे प्रभावीत होणार आहेत.
Powered By Sangraha 9.0