सातारा,
school harassment case साताऱ्यातील एका नामांकित शाळेत विद्यार्थ्यांवर लैंगिक छळ झाल्याच्या धक्कादायक प्रकरणामुळे शहरात खळबळ उडाली आहे. शाळेतील केअरटेकरकडून मुलांचा लैंगिक व मानसिक छळ केल्याचा आरोप असून या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली होती. मात्र न्यायालयाने त्याची जामिनावर मुक्तता केली आहे.
या प्रकरणात सुरुवातीला तीन विद्यार्थ्यांवर अत्याचाराचा प्रयत्न झाल्याची तक्रार नोंदवण्यात आली होती. तपास पुढे सरकल्यानंतर अशा स्वरूपाच्या तक्रारींची संख्या वाढत गेली असून आतापर्यंत एकूण २४ विद्यार्थ्यांवर लैंगिक व मानसिक छळ झाल्याच्या तक्रारी पोलिसांकडे आल्या आहेत, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी दिली.पोलिसांनी या प्रकरणी ऋषिकेश सुभाष चव्हाण या आरोपीला अटक केली होती. त्याला न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्याला जामीन मंजूर केला असल्याची माहितीही पोलीस अधीक्षक दोशी यांनी दिली.
मिळालेल्या माहितीनुसार, school harassment case संबंधित शाळेतील केअरटेकर मुलांना अयोग्य स्पर्श करत असल्याच्या तक्रारी समोर आल्या होत्या. काही विद्यार्थ्यांनी याबाबत तक्रार केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. याशिवाय विद्यार्थ्यांना मारहाण करणे आणि पैसे मागणे अशा स्वरूपाच्याही तक्रारी पोलिसांकडे आल्या आहेत.या प्रकरणी सातारा पोलिसांनी ७ तारखेला गुन्हा दाखल केला असून पोक्सो कायद्यासह भारतीय न्याय संहितेतील कलम ११५ (२) आणि ३५१ (२) अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सुरू असल्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी सांगितले.दरम्यान, या प्रकरणात प्रत्यक्ष लैंगिक अत्याचाराचा गुन्हा नसून लैंगिक छळाचा आरोप असल्याने न्यायालयाने आरोपीला जामीन मंजूर केल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. या घटनेमुळे पालकांमध्ये चिंता व्यक्त होत असून शाळांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.