नवी दिल्ली,
t20-world-cup-victory २०२६ मधील आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक मध्ये ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर भारताच्या क्रिकेट संघाच्या जर्सीत मोठा बदल करण्यात आला आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या चिन्हावर आता तीन तारे दिसणार आहेत. यापूर्वी जर्सीवर दोन तारे होते, जे भारताच्या दोन विश्वविजयांचे प्रतीक होते. यंदाच्या यशानंतर तिसरा तारा जोडण्यात आला असून यासंदर्भात मंडळाने विशेष दृश्यफीत प्रसिद्ध केली आहे.

अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या अंतिम सामन्यात भारताने न्यूझीलंडवर तब्बल ९६ धावांनी दणदणीत विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना भारताने पाच बाद २५५ धावांचा भक्कम डोंगर उभारला. ही धावसंख्या विश्वचषकाच्या अंतिम सामन्यातील विक्रमी ठरली. t20-world-cup-victory भारतीय डावाची पायाभरणी संजू सॅमसन याने आपल्या स्फोटक फलंदाजीने केली. त्याने केवळ ४६ चेंडूत पाच षटकार आणि आठ चौकारांच्या मदतीने ८९ धावांची झंझावाती खेळी साकारली. त्याच्या या कामगिरीमुळे त्याला स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू म्हणून गौरविण्यात आले. त्याला अभिषेक शर्मा याच्या ५२ धावा आणि इशान किशनच्या ५४ धावांची चांगली साथ लाभली. शेवटच्या टप्प्यात शिवम दुबे याने अवघ्या आठ चेंडूत नाबाद २६ धावा करत संघाला २५० धावांच्या पुढे नेले.

इतक्या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंडचा संघ भारतीय गोलंदाजांसमोर टिकू शकला नाही. अवघ्या १९ षटकांत त्यांचा डाव १५९ धावांवर संपुष्टात आला. भारताकडून जसप्रीत बुमराह याने चार बळी घेत सामनावीराचा मान पटकावला, तर अक्षर पटेल याने तीन बळी घेत प्रतिस्पर्धी संघाच्या आशा संपुष्टात आणल्या. t20-world-cup-victory या विजयामुळे भारताने टी-२० विश्वचषकाचे विजेतेपद कायम राखत इतिहास रचला. तसेच घरच्या मैदानावर हा किताब जिंकणारा पहिला देश होण्याचा मानही भारताला मिळाला. २००७ आणि २०२४ नंतर मिळालेले हे तिसरे विजेतेपद आता भारतीय जर्सीवरील तिसऱ्या ताऱ्याच्या रूपाने कायम चमकत राहणार आहे.