मुंबई,
The road to the tune of Jai Ho in Mumbai मुंबईतील सागरी किनारा मार्गावर सुरू करण्यात आलेल्या संगीतमय रस्त्यावरील ‘जय हो’ या धुनेवर आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या मार्गावर बसवण्यात आलेल्या विशेष पट्ट्यांमुळे वाहनं जाताना तयार होणाऱ्या ध्वनीमुळे रहिवाशांना त्रास होत असल्याच्या तक्रारी वाढू लागल्याने महानगरपालिकेने याची गंभीर दखल घेतली आहे. त्यामुळे या रस्त्यावरील ध्वनी परिणामाचा सखोल अभ्यास करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

मुंबईतील वाहतुकीसाठी महत्त्वाचा ठरणाऱ्या या सागरी किनारा मार्गाला नुकतीच संगीतमय रस्त्याची नवी ओळख देण्यात आली होती. या मार्गावरून प्रवास करताना वाहनांच्या चाकांमुळे निर्माण होणाऱ्या घर्षणातून प्रसिद्ध ‘जय हो’ या गाण्याची धून ऐकू येईल, अशी विशेष व्यवस्था करण्यात आली होती. मरीन ड्राइव्ह बोगद्याबाहेर अमरसन्स गार्डन ते ब्रिच कँडी या सुमारे सातशे मीटर अंतरावर पहिल्या मार्गिकेत हा प्रयोग करण्यात आला होता. रस्त्यावर विशिष्ट अंतरावर बसवलेल्या पट्ट्यांवरून वाहनं ठरावीक वेगाने गेल्यास त्या घर्षणातून स्वर निर्माण होऊन वाहनातील प्रवाशांना गाण्याची धून ऐकू येते, अशी ही संकल्पना आहे. या नवकल्पनेची मोठी चर्चा झाली होती आणि अनेकांनी या रस्त्यावरून प्रवास करून या अनुभवाचा आनंदही घेतला.
मात्र काही दिवसांतच या प्रयोगाबाबत स्थानिक रहिवाशांकडून तक्रारी येऊ लागल्या. विशेषतः ब्रिच कँडी परिसरातील नागरिकांनी या ध्वनीमुळे दैनंदिन जीवनात अडथळा निर्माण होत असल्याची नाराजी व्यक्त केली. या परिसरातील सहाशेहून अधिक कुटुंबांनी महानगरपालिका प्रशासनाकडे लेखी तक्रारही सादर केली आहे. वाहनं या पट्ट्यांवरून जाताना निर्माण होणारा आवाज जवळच्या घरांपर्यंत पोहोचत असल्याने खिडक्या उघड्या ठेवणेही अवघड होत असल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे. या तक्रारींची दखल घेत महानगरपालिकेने आता या संगीतमय रस्त्याचा सखोल आढावा घेण्यास सुरुवात केली आहे. ध्वनीची तीव्रता मोजून ती परवानगीयोग्य मर्यादेत आहे की नाही याचा अभ्यास करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या अभ्यासातून आवाजामुळे परिसरातील नागरिकांना त्रास होत आहे का, तसेच ध्वनी प्रदूषणाची पातळी किती आहे, याचा तपशील समोर येणार आहे. या अहवालाच्या आधारे पुढील निर्णय घेतला जाणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.