'अध्यक्षा'नंतर आता मतपत्रिकाही जाणार लवादाकडे!

- पाच मतदारांच्या नावे परस्पर मतदान झाल्याचे उघड - वि. सा. संघ मतपत्रिकांचा घाेळ संपेना

    दिनांक :09-Mar-2026
Total Views |
नागपूर,
vidarbha-sahitya-sangh-elections : विदर्भ साहित्य संघाच्या निवडणुकीचा आखाडा चांगलाच रंगला आहे. अध्यक्षपदासाठी उभ्या असलेल्या एका उमेदवाराची तक्रार लवादाकडे झाली हाेती. ते प्रकरण निकाली निघून वातावरण शांत हाेत नाही ताेच मतदारांच्या मतपत्रिका परस्पर मिळवून त्यावर बाेगस मतदान केल्याची पाच प्रकरणे उघडकीस आली आहे. याबाबत आपण लवादाकडे जाणार असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी माेहन पारखी यांनी सांगितले.
 
 

nagpur 
 
 
 
दाेनच दिवसांपूर्वी वि. सा. संघाचे आजीव सभासद असलेले भंडारा तालुक्यातील लाखनी येथील डाॅ. गाेविंद नीळकंठ हडप यांची मतपत्रिका त्यांना प्राप्त न झाल्याने त्यांनी वि. सा. संघात येऊन विचारणा केली. यावेळी त्यांचे मतदान झाल्याचे त्यांना सांगण्यात आले. हे प्रकरण ताजे असतानाच गडचिराेली जिल्ह्यातील आरमाेरी येथील सुधीर रामचंद्र भातकुलकर, स्वाती सुधीर भातकुलकर, डाॅ. महेश पांडुरंग काेपुलवार आणि विजयकुमार ठवरे यांनी आपल्या मतपत्रिका अद्याप प्राप्त न झाल्याची तक्रार आरमाेरी येथील पाेस्ट मास्तरांकडे केली. त्याची प्रत वि. सा. संघाचे निवडणूक निर्वाचन अधिकारी आणि सरचिटणीस यांनाही पाठविण्यात आली. विशेष म्हणजे या चारही मतदान झालेल्या मतपत्रिका आज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे पाेहाेचल्या. तसेच गाेंदिया येथील राजेश्री संजय धामाेडीकर यांची मतपत्रिकाही त्यांच्यापर्यंत न पाेहचता परस्पर मतदान करून पाेस्टाने वि. सा. संघात पाेहोचल्याची माहिती मिळाली. हा प्रकार गंभीर असून यासाठी लवादाकडे जाणार असल्याचे माेहन पारखी यांनी सांगितले.
 
 
2 हजार 621 जणांचे मतदान
मतदान करण्याची अंतिम तारीख 14 मार्च असून मतपत्रिका पाेस्टाने आणि प्रत्यक्ष वि. सा. संघात आणून देण्याचा ओघ आता वाढू लागला आहे. आजपर्यंत(9 मार्च) 2 हजार 621 जणांनी मतदान केल्याची माहिती आहे. यामध्ये टपालाने 1 हजार 150, मतदारांनी स्वतः आणून दिलेल्या 246 तर प्रतिनिधींद्वारे 1 हजार 225 मतपत्रिका प्राप्त झाल्याची माहिती पारखी यांनी दिली. तसेच आजवर 1 हजार 996 मतपत्रिका वि. सा. संघात परत आल्या. त्यातील 300 च्या आसपास पत्रिका मतदारांनी ओळख पटवून परत नेल्या आहेत.